सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील श्रीमंतयोगी वाद्य पथकाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पिंपळे जगताप येथील सेवाधाम मतिमंद विद्यालयातील दिव्यांग मुलांसोबत रक्षाबंधन साजरी केली. रक्षाबंधन या पवित्र सणाच्या निमित्ताने दीव्यांग मुलांना पथकातील मुलींनी राख्या बांधून सामाजिक एकात्मता आणि समाजाप्रति आपली जबाबदारी दाखवून देत एक आदर्श निर्माण केला.
श्रीमंतयोगी वाद्य पथकात ८० वादक असून गेले ८ वर्षे पथक सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत असते. सेवा धाम मतिमंद विद्यालयात रक्षाबंधन साजरे करण्याचे पथकाचे यंदा ५ वे वर्ष असून जो पर्यंत पथक चालू आहे तो पर्यंत याच विद्यालयात रक्षाबंधन साजरा करणार असल्याचे पथकाचे संस्थापक सागर गव्हाणे यांनी सांगितले. मतिमंद विद्यालयात रक्षाबंधन साजरा करण्या बरोबरच विद्यालयास जर काही वाद्यांची गरज भासल्यास ती देखील पूर्ण करण्याचे आश्वासन सागर गव्हाणे यांनी दिले.
या पवित्र सणाच्या निमित्ताने पथकातील युवती वादकांनी समाजातील सर्व बांधवांना एकात्मतेचा संदेश दिला आणि सर्व दिव्यांग बांधवांचे रक्षण करण्याचा प्रण केला. रक्षाबंधनाच्या या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी निरोगी आणि स्वस्थ राहावे म्हणून फळवाटप आणि पथकाच्या वतीने दिव्यांग मुलांना खाऊवाटप, खाऊ वाटप, शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन सागर गव्हाणे (संस्थापक), भानुदास ढेरंगे (अध्यक्ष), प्रसाद देशमुख (उपाध्यक्ष), कालिदास शिंगाडे, अमित सिंग, भूषण भारंबे, योगेश ढगे, भाग्येश खोले, प्रथमेश मंगळे, आतिष कांबळे, स्वप्नील गव्हाणे, आदेश चव्हाण तसेच पथकातील मुली शिवांजली देशमुख, योगिता कांबळे, सलोनी राठोड, अभिलाषा गव्हाणे, सानू झांबरे, ज्ञानेश्वरी निकम, तनुजा शितकर, प्रतीक्षा चव्हाण, श्रद्धा पिंपळे, प्रणिता लुनावत, श्रुष्टी पवार, पालवी पवार, तसेच पथकातील सर्व वादकांनी केले.
दिव्यांगांसोबत सण साजरा करण्याची काळाची गरज पुणे जिल्ह्यात दिव्यांग मुलांच्या अनेक शाळा आहेत. या शाळा कायम आर्थिक टंचाई मध्ये असल्याचे जाणवते. म्हणूनच समाजामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, ढोल पथक, चॅरीटेबल ट्रस्ट यांनी रक्षाबंधन, दिवाळी, रंगपंचमी, रमजान ईद, बकरी ईद यांसारखे इतर सण दिव्यांग मुलांच्या शाळेत साजरा करण्याची काळाची गरज आहे.