रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
डिझेल भरण्याच्या वादातून निमगाव भोगी (ता. शिरुर) सध्या रा. खराडी , पुणे येथील युवकाची पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी झाल्यानंतर युवकाचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत खंडाळा माथा येथे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. याबाबत दोन आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.
या संदर्भात संतोष केरभाऊ पावसे (वय ३९ ) रा. खराडी बालाजी हॉस्पिटल शेजारी, पुणे यांनी याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष पावसे यांचा पुतण्या आदित्य रामदास पावसे हा (दि २१ ) सप्टेंबर रोजी राञी दोन वाजता रांजणगाव येथील खंडाळमाथा येथील इंडियन आँईल पेट्रोल पंपावर थार गाडीत डिझेल भरण्यासाठी गेला असता पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत पैशावरुन वादावादी झाली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी आदित्य पावसे याच्या थार गाडीच्या काचा फोडल्या , नुकसान केले. व त्याच्या मनात भिती उत्पन्न करुन , मानसिक ञास देऊन आरोपी विजय शिंदे व सुहास वडघुले व अन्य आरोपींनी आदित्य यास आत्महत्येस प्रवृत्त केले. व आदित्य ने रांजणगाव गणपती येथील संतोष रघुनाथ खेडकर यांच्या शेतातील बांधावर असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगितले. आदित्य यास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी विजय शिंदे व सुहास वडघुले व अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश ढवाण हे करत आहेत.