कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील शेतकऱ्यावर बिबट्याने काल शुक्रवार ता 20 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पठार वस्ती येथे उसाच्या शेतामध्ये पाणी बारे बदलताना अचानक प्राणघातक हल्ला केला, आनंदा किसन फडतरे वय 47 असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे,
काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फडतरे हे आपल्या शेतामध्ये उसावर पाणी लावण्यासाठी बारे बदलत असताना उसाच्या सरीत उभा असणाऱ्या बिबट्याने फडतरे यांच्यावर अचानक उडी मारून झडप घातली, वाढलेल्या उसामध्ये बिबट्या दिसला नसल्याने, तसेच अचानक हल्ला झाल्याने शेतकरी फडतरे खूप घाबरून गेले, यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून बिबट्याचा दात त्यांच्या वरच्या ओठांमध्ये, हाताच्या अंगठ्यामध्ये घुसला असून, बिबट्याने आपल्या पंज्याने फडतरे यांच्या तोंडाला,डोक्याला, हाताला, पायाला, दंडाला गंभीर दुखापत केली आहे, फडतरे यांनी बिबट्याच्या तोंडात हात घातल्यामुळे त्यांचा बचाव झाल्याचे सांगितले,
या हल्ल्यानंतर फडतरे यांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी धनंजय फडतरे व शहाजी फडतरे यांनी धाव घेतली, दरम्यानच्या काळात बिबट्या हल्ला करून समोर उसाच्या सरीत उभा पाहत होता, यावेळी आनंदा फडतरे यांनी बरे बदलण्यासाठी आणलेले खोरे उचलले व बिबट्याच्या दिशेने उगारले असता बिबट्या शांत उभा राहिला त्यानंतर आनंदा फडतरे यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, यावेळी वनविभाग शिरूर चे अधिकारी व कर्मचारी यांनी फडतरे यांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच तक्रार दाखल करून लसीकरण उपलब्ध करून दिले आज पुढील उपचारासाठी फडतरे यांना ससून हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे,