वाघोली प्रतिनिधी
गेली अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी केसनंद राज्य मार्गाने वाहत आहे. नागरिकांनी सातत्याने मागणी करुन देखील याकडे संबधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने जेजे नगर व परिसरातील संतप्त नागरिकांनी मनसेचे अॅड. गणेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली वाघोली येथील मनपा संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने अधीक्षक यांच्या खुर्चीला हार घालून नागरिकांनी गांधीगिरी आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी कायालयामध्ये ठिय्या आंदोलन केले. दोन दिवसांत पाणी बंद न झाल्यास दुर्गंधीयुक्त पाण्याने अधिकाऱ्यांना अंघोळ घालण्याचा इशारा देखील यावेळी नागरिकांनी दिला.
ड्रेनेज लाईनचे पाणी केसनंद फाटा येथील मैदानात उघडयावर सोडले असून ते पाणी केसनंद रोडवर मोठ्याप्रमाणावर वाहत आहे. रोडवर असलेल्या खाड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबरोबर अनके दुचाकी स्वार खाड्यांमध्ये पडून अपघात झाल्याने गंभीर दुखापत झाली आहे.
अगोदरच सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरियाची साथ चालू असताना ड्रेनेज लाईनच्या पाण्याने त्यामध्ये आणखी भर पडली आहे. महापालिकेचे अधिकारी व पीडब्ल्यूडीचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबादारी झटकत असल्याने नागरिकांच्या आरोग्यासह सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पीएमसीच्या कनिष्ठ अभियंता रुपाली वाळके यांची प्रतिक्रीया घेतली असता तो आमचा विषय नसून सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रश्न आहे. त्यांना पत्राद्वारे कळविले असल्याचे वाळके यांनी सांगितले.