वाघोली प्रतिनिधी
वाघोली (ता हवेली) येथे नगर रोड केसनंद फाट्यावर पुणे नगर रस्त्यावर चालणाऱ्या थ्री सीटर रिक्षा व खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांची मुजोरी वाढली असून याकडे वाहतूक पोलीस नियंत्रण विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी नागरिकांच्या वतीने होत आहे.
भर रस्त्यावर मधोमध ही वाहने प्रवासी भरण्याकरिता उभी असतात.यामुळे पुणे नगर रोडवरील केसनंद फाटा येथे वाहतूक कोंडी होताना दिसून येते. रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत .बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना शासनाच्या बसमध्ये चढण्याकरिता या रिक्षा धारकांमुळे मोठी अडचण निर्माण होते .अशा बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना रिक्षावाले प्रसंगी अरे रावीची भाषाही करताना दिसून येतात. तर तुमची पोलीस प्रशासनास तक्रार करू असे प्रवाशांनी बोलल्यास कुठल्या पोलीस चौकीत जायचे बोला असे उलट प्रश्न प्रवाशांना खाजगी प्रवासी वाहतूकदार व रिक्षा वाले करत आहे. तसेच आम्ही रोड टॅक्स देतो आम्ही रस्त्यावरच वाहने उभी करणार अशी भाषा प्रवाशांना वापरली जाते.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत सर्रास वाहतूक होताना वाघोलीत दिसते.तर खाजगी प्रवास भाडे यावर कुठलेही नियंत्रण नाही. तसेच खाजगी वाहतूकदार जे म्हणतील तेवढे प्रवासी भाडे नागरिकांकडून वसूल केले जाते. अशी मुजोरी केव्हा थांबणार असा सवाल प्रवासी नागरिक करत आहेत.