आळंदी मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई आळंदी भाविकांचे स्वागतास सज्ज ; हरिनाम गजरआरोग्य सेवा; पोलीस बंदोबस्त तैनात

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी
         श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२८ वा संजीवन समाधी दिन सोहळा यावर्षी कार्तिकी यात्रा २०२३ अंतर्गत साजरा होत आहे. आळंदी यात्रेस भाविक राज्य परिसरातून दिंड्यां दिंड्यांतून हरिनाम गजरात दाखल झाले असून भाविकांचा ओघ आळंदीकडे सुरूच आहे. लाखो भाविक आळंदीत दाखल झाल्याने आळंदीत विविध ठिकाणी हरिनाम गजर सुरू झाला आहे. राज्यातून येणाऱ्या भाविकांसह नागरिकांची यात्रा काळात गैरसोय होऊ नये यासाठी आळंदी नगरपरिषदेने विविध नागरी सेवा सुविधां देण्यासह उपाय योजना केल्या आहेत. नगरपरिषद प्रशासन भाविकांचे स्वागतास सज्ज असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.
        आळंदीत कार्तिकी यात्रा काळात सोहळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी आळंदी नगरपरिषदेने पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचना प्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रांताधिकरी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी केली आहे. यात्रा काळात भाविकांना नागरी सेवा सुविधा या अंतर्गत देण्यात येणार असून नागरी सेवा सुविधा देण्यास नगरपरिषद, महसूल, आरोग्य सेवा प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.
         पाणी पुरवठा विभागाचे माध्यमातून कार्तिकी यात्रेच्या कालावधीत २४ तास पंपिग चालु ठेवुन झोन पध्दतीने पुरेशा प्रमाणात नियमित शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा केंद्रामधील मशिनरी, मोटार्स इत्यादी सुस्थितीत ठेवण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,पुणे यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. तांत्रिक अधिका-यांचे मार्गदर्शनाने पाणी पुरवठा नियमित होण्यासाठी दक्षता घेण्यात आली आहे. आळंदीला आता थेट भामा आसखेड धरणातील पाणी बंधिस्त पाईप लाईन मधून पुरवठा होत असल्याने भाविकांच्या पिण्याचे पाण्याची गैरसोय दूर झाली आहे. आळंदी शहरा करीता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांचेकडे देखील मागणी करण्यात आली आहे. पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय शासकीय पाण्यााचे टॅकर, खाजगी पाण्याचे टँकर भाड्याने घेण्यात आले असून ते ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहेत.  

आळंदीत संयुक्त अतिक्रमण कारवाई प्रभावी  
          पिंपरी चिंचवड महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलिस यंत्रणा, वाहतूक पोलीस यांचे मार्फत संयुक्त अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. रहदारीला अडथळा होणार नाही, याची यातून दक्षता घेण्यात येत असल्याचे वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सांगितले.

आळंदी शहरात प्रकाश व्यवस्था प्रभावी
       संपूर्ण आळंदी शहरात रस्त्यावरील दिवाबत्ती प्रभावी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून याची तयारी पूर्ण झाली आहे. इंद्रायणी नदी घाट, प्रदिक्षणा रस्ता व शहरा अंतर्गत रस्ते, आवश्यक  त्या ठिकाणच्या रस्त्यावरील नादुरूस्त विदयुत दिवे युध्द पातळीवर दुरूस्त करून बसविण्यात आले आहेत. प्रदक्षिणा मार्ग, शहरा अंतर्गत असलेले चौक, इंद्रायणी नदी घाट, सिद्धबेट आदी ठिकाणी फ्लडलाईट ( फोकस ) लावुन जादा विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.  

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत  
 आळंदीत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व शासकिय खात्यातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी संपर्क यंत्रणा उपलब्द्ध करून देण्यात आली आहे. विविध खात्या मार्फत यात्रा काळात केलेल्या नियोजनाचा आराखडा, नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे नियुक्त केलेल्या वेळे प्रमाणे नांव व संपर्काची यादी ठेवण्यात आली आहे.

सी.सी.टी.व्ही ची कार्तिकी यात्रेवर नजर  
 कार्तिकी यात्रा काळात सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी विविध ठिकाणी शहरात सी.सी.टी.व्ही ची यात्रेवर नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी पोलिस ठाण्यात तसेच आळंदी नगरपरिषद कार्यालयातून यात्रा व गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.

पब्लीक अॅडरेस सिस्टिम जाहीर सूचनांसाठी कार्यरत
 पब्लीक अॅडरेस सिस्टिम वॉकी-टॉकी शहरात कार्यरत ठेवण्यात आली आहे. संपुर्ण शहरामध्ये सुचना व हरविलेल्या व्यवक्तींची माहिती देण्यासाठी केंद्रीय सुचना यंत्रणा बसविण्यात आली आहे. यात्रा काळात भाविक भक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविणे बाबत तसेच इतर शासकिय यंत्रणा संपर्क साधण्यास सूचना देण्यासह नियोजन करण्यात आले असल्याचे आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.

स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदी साठी उपाय योजना
आळंदी हे स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदी साठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता सफाई ठेकेदार आणि पालिकेचे कामगार यांचे वतीने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. आळंदी शहरातील तुंबलेली गटारे, कचरा कुंड्या स्वच्छ ठेवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. विल्हेवाट लावणे, पावडर व आवश्यक ते जंतुनाशके फवारणे तसेच फॉगिंग चे शहरात काम सुरु झाले आहे. धुराडी फवारणी  प्राधान्याने करण्यात आली आहे. नगरपरिषदेने अनेक ठिकाणी मोबाईल टॉयलेट बसविले आहे. चाकण चौक, शाळा क्र. १, नगरपरिषदेच्या ग्राऊंडवर सुलभ शौचालय कार्यरत ठेवले आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शेकडो शौचालय, नगरपरिषद शाळा परिसर, एस.टी.स्टॅंडचे मैदानात, नविन पुला लगत, सिध्दबेटाकडे जाणा-या रस्त्याच्या कडेने जादा शौचालयाची उभारणी करुन स्वच्छते बाबत व्यवस्था केली असल्याने शहरात आरोग्य सेवेसह यात्रा नियोजनातून नगरपरिषद भाविकांचे स्वागतास सज्ज झाली असल्याचे मुख्याधिकारी काहीशा केंद्रे यांनी सांगितले.

इंद्रायणी नदी वर महाआरती उपक्रम
आळंदी येथील इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट तर्फे नित्यनेमाने दैनंदिन इंद्रायणी नाडीची महाआरती उपक्रम सुरु केला असल्याचे अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. या उपक्रमास संस्थेचे खंजिनदार भोलापुरीजी महाराज, सचिव लक्ष्मण घुंडरे, उपाध्यक्ष राहुल चव्हाण, सदस्य सागर महाराज लाहुडकर, रोहिदास कदम, ज्ञानेश्वर घुंडरे, तुकाराम नेटके, दिनकर तांबे,सचिन महाराज शिंदे, गोविंद तौर आदी परिश्रम घेत आहे. भाविक, नागरिकांची उपस्थिती वाढत आहे.
आरोग्य सेवेस प्रारंभ हजारो भाविकांची तपासणी
आळंदी कार्तिकी यात्रेत भाविक, नागरिकांच्या आरोग्य सेवेस प्राधान्य देण्यात आले असून प्रभावी आरोग्य सेवा पुणे जिल्हा परिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग यंत्रणा यांचे माध्यमातून सुरु करण्यात आली असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदू वणवे यांनी सांगितले. आळंदी कार्तिकी यात्रेच्या पहिल्या दिवशी ३ हजार ६०० वर भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.

आळंदी मंदिरावर विद्युत रोषणाई
तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरावर कार्तिकी यात्रेचे निमित्त लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसर तसेच आळंदी देहू परिसर विकास समितीचे माध्यमातून इंद्रायणी नदी घाटावर देखील लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे मंदिर आणि नदी घाट परिसर प्रकाश झोतात आला आहे. भाविक, नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!