लोणी काळभोर प्रतिनिधी
पुण्याचे पोलिस आयुक्त अमीतेश कुमार यांनी काही पोलिस चौकीला भेट दिल्यानंतर त्यांचा असे लक्षात आले की पोलिस कंप्लेंट घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे काम करतील तेच टिकतील अन्यथा त्यांना बदलण्यात येईल.
पोलिस चौकीच्या प्रभारी अधिकार्यांची नेमणूक स्वतः पोलिस उपायुक्त करतील. चौकीच्या अधिकार्याकडून आम्हाला तीन अपेक्षा आहेत. पहिली हद्दीतील गुन्हेगारीवर त्यांचा वचक असला पाहिजे. दुसरी सर्व अवैध धंदे बंद आणि तिसरी येणार्या तक्रारींची योग्य दखल. त्यामुळे जे अधिकारी चौकीत काम करतील तेच टिकतील अन्यथा त्यांची बदली होईल असा इशाराच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
अमितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तालयात पत्रकारांसोबत बुधवारी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पुणे शहरातील पोलिस चौकी प्रणाली अतिशय चांगली आहे. पोलिस खात्यात आल्यानंतर याबाबत अनेकदा ऐकले आहे. मात्र, सध्या त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मागील काही दिवसांपूर्वी फरासखाना पोलिस ठाण्यात अमितेश कुमार गेले होते. ते म्हणाले, पोलिस ठाण्यात गेल्यानंतर एक महिला बाहेर बसलेली दिसली. आम्ही तिला विचारले तुमचे काय काम आहे. तिने सांगितले घरफोडी झाली आहे. मी विचारले किती दिवस झाले. ती म्हणाली, दोन दिवस झाले. एवढे दिवस तक्रार का दिली नाही.
तिने सांगितले, जेव्हा घरफोडी झाली तेव्हाच तक्रार देण्यासाठी चौकीत गेले. मात्र, तेथील अधिकार्यांनी 'उद्या या' म्हणून सांगितले. परत गेले तर ते पुन्हा 'उद्या या' म्हणाले. शेवटी त्यांनी पोलिस ठाण्यात पाठवून दिले. आज तक्रार देण्यासाठी आले आहे. अमितेश कुमार यांनी काही पोलिस चौक्यांना भेटी दिल्या. त्या वेळी त्यांनी चौकीच्या हद्दीतील माहिती प्रभारी अधिकार्यांना विचारली. सराईत आरोपींची नावे, त्यांचे रेकॉर्ड, त्याचबरोबर त्यांच्यावर केलेली प्रतिबंधात्मक कारवाई आदी बाबींचा आढावा त्यांनी घेतला. परंतु त्यांना अपेक्षित असणारी माहिती मिळाली नाही. त्या पार्श्वभूमीवर अमितेश कुमार शहरातील सर्व चौकी प्रभारींची आता बैठक घेणार आहेत. या बैठकीत त्यांनी केलेल्या कामाचा ते आढावा घेणार असून, एकप्रकारे संबंधित अधिकार्यांचे मुल्यमापनच करणार आहेत. जे अधिकारी चौकीत चांगले काम करतील तेच तेथे काम करतील अन्यथा त्यांची बदली करण्यात येईल असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस उपायुक्त चौकीत काम करणार्या अधिकार्यांची नेमणूक करतील, असेदेखील अमितेश कुमार यांनी सांगितले.
अनेकदा पोलिस चौकी आणि पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या तक्रारदारांना ताटकळत ठेवले जाते. काही पोलिस चौक्या आणि पोलिस ठाणे त्याला अपवाद असतील. मात्र, बहुतांश पुणेकरांचा हा अनुभव आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार मात्र आता हे चित्र बदलू पाहत आहेत. तक्रारदारांना पोलिस ठाण्यात आल्यानंतर सुरक्षित वाटले पाहिजे. त्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाते, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असल्याचेदेखील अमितेश कुमार यांनी सांगितले.
*तिसर्या डोळ्याची पोलिस चौकीवर राहणार नजर*
पोलिस चौकीच्या कामकाजावर आता तिसर्या डोळ्याची (सीसीटीव्ही) नजर असणार आहे. पोलिस ठाण्याप्रमाणेच शहरातील सर्व पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. याबाबतची निविदादेखील काढण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
पोलिस चौकीत काम करणार्या अधिकार्यांना काम दाखवावे लागणार आहे. चांगले काम करतील तेच तेथे राहतील. गुन्हेगारांवर वचक ठेवून नागरिकांच्या तक्रारींची त्यांनी योग्य वेळी तत्काळ दखल घेणे अपेक्षित आहे. लवकरच चौकीला काम करणार्या अधिकार्यांची बैठक घेण्यात येणार आहे.
– अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर.