सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे पोलीस चौकी समोरच आरटीओची स्कार्पिओ गाडी आयशर टेम्पोवर आदळून झालेल्या अपघातात आरटीओच्या गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, मात्र अपघातानंतर आरटीओची अपघात ग्रस्त गाडी घेऊन आरटीओचे अधिकारी व कर्मचारी फरार झाल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
पुणे नगर महामार्गालगत वाहनांची तपासणी करण्यासाठी आरटीओ अधिकारी त्यांच्या एम एच ०४ के आर ६४१२ या वाहनातून आलेले असताना कोरेगाव भीमा पोलीस चौकी समोरच आरटीओची स्कार्पिओ गाडी समोरील आयशर टेम्पोच्या डिझेल टाकीवर आदळून अपघात झाला यामध्ये आरटीओच्या शासकीय गाडीचे मोठे नुकसान झाले, अपघातानंतर नागरिकांनी अपघातग्रस्त ठिकाणी मोठी गर्दी केले होती, मात्र आरटीओच्या शासकीय वाहनातील अधिकारी व वाहनावरील चालक अपघातग्रस्त वाहन घेऊन घटनास्थळाहून फरार झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे,
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी घटनास्थळी गेले परंतु कोणतेही वाहन सदर ठिकाणी दिसून आले. तर याबाबत शिक्रापूर पोलिसांशी संपर्क साधला असता या घटनेबाबत माहिती मिळालेली आहे मात्र त्याबाबत तक्रार देण्यासाठी कोणीही आले नसल्याने पोलिसांनी सांगितले. तर याबाबत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी संजीव भोर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही
जर नियमांचे धडे देणाऱ्या आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनच नियमांची पायमल्ली होत असेल तर नागरिकांनी त्यांचा काय आदर्श घ्यायचा हा मोठा प्रश्न आहे.
या अपघातानंतर आरटीओ अधिकारी कर्मचारी यांनी अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना देणे गरजेचे होते,तसे न करता ते तसेच अपघात ग्रस्त वाहन घटना स्थळावर घेऊन गेले.आरटीओची गाडी असल्याने ज्या वाहनाला धडक दिले तो वाहनचालक देखील आरटीओच्या भितीने तक्रार देण्यासाठी पुढे न येता निघून गेल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.