लोणी काळभोर प्रतिनिधी
काल अहिल्यानगर येथे संपन्न झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाभिक समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील न्हावी समाजाने मराठा समाजातील लोकांची हजामत करू नये असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. यावर राज्यभारतील नाभिक समाजाकडून आक्षेप नोंदवून निषेध व्यक्त केला जात आहे.
नाभिक समाजाचे नेते व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. सुरवसे-पाटील म्हणाले, “मी देखील ओबीसी समाजाचाच भाग आहे. मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी समाजासाठी लढत आहेत. ही लढाई लढत असताना त्यांनी ओबीसी समाजातील जातींचा भाषणादरम्यान सन्मानपूर्वक उल्लेख करावा. कुणाचीची अस्मिता दुखावली जाणार नाही यांची काळजी घ्यावी. न्हावी या शब्दाऐवजी नाभिक असा उल्लेख भुजबळ यांनी करायला पाहिजे होता. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे टाळले पाहिजे.”
पुढे बोलताना सुरवसे पाटील म्हणाले, नाभिक समाजाचा परंपरागत व्यवसाय हा सर्व समाजाची सेवा करून उदरनिर्वाह करण्याचे साधन आहे. सर्व जाती आणि धर्मातील लोकांची हजामत करून, सेवा करून त्याद्वारे नाभिक समाज बांधव रोजीरोटी कमावतात. त्यामुळे समाज बांधवांनी भुजबळांचे ऐकून कोणत्याही समाजावर बहिष्कार टाकून व्यवसायात अडथळा निर्माण करून घेऊ नये. मंत्री भुजबळ यांनी इथून पुढे बोलताना तारतम्य बाळगावे. कोणाच्या तरी स्क्रिप्टनुसार भाषणबाजी करू नये अन्यथा त्यांना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात येईल.”