पुणे प्रतिनिधी
सेंट मिराज कॉलेज समोरील साधू वासवानी पूलाची मुदत संपल्याने नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी रस्त्याच्या कडेला असलेली जुन्या पुरातन वडासह इतर झाडे तोडण्यात येणार आहेत. सुमारे ६१ वृक्ष काढण्यात येणार असल्याने वृक्ष प्रेमींनी याला कडाडून विरोध केला आहे.
कोरेगाव पार्क पेट्रोल पंप पासून ते बार्टी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला सुमारे १६१ वृक्ष आहेत. पुरातन वडाचे वृक्ष अनेक वर्षांपासून सावली आणि ऑक्सिजन देत आहेत. परंतु साधू वासवानी पूल नव्याने बांधण्यात येणार असल्याने ६१ वृक्ष काढली जाणार आहेत. यामध्ये ९ वृक्ष पूर्णतः काढली जाणार असुन ५२ वृक्ष काढून दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार आहेत. महापालिका प्रकल्प विभागाने यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाकडे परवानगी मागतली आहे.
चलो पीएमसी, पुणे संवाद या पर्यावरण प्रेमी ग्रुपने याला विरोध केला आहे. पर्यावरण प्रेमी सोबत सहाय्याक उद्यान अधीक्षक गुरुप्रसाद तुमाले, हॉर्टिकल मिस्त्री अशोक आटोळे, महापालिका प्रकल्प विभागाचे शाखा अभियंता रणजीत मुटकुळे आदि उपस्थित होते. यावेळी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
साधू वासवानी पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने नव्याने बांधण्याचा प्रस्ताव आहे. पुलाच्या बांधकामात काही वृक्ष अडथळा ठरत असल्याने ते काढावे लागणार आहेत. या बदल्यात नव्याने वृक्ष लागवड केली जाणार आहे. - रणजीत मुटकुळे (शाखा अभियंता)
सहायक उद्यान अधिक्षक गुरुप्रसाद तुमाले म्हणाले, वडाची जुने वृक्ष वाचविण्यात येणार आहेत. मात्र ९ वृक्ष पूर्णतः तोडले जाणार असून ५२ वृक्ष काढून त्याचे पुनर्रोपण केले जाणार आहेत.
शहरात जवळपास ५० पूल बांधण्यात आले आहेत. मात्र वाहतूक कोंडी कमी झाली नाही. याठिकाणी वाहतूक कोंडी होत नसताना पूल बांधला जाणार आहे. जर महापालिकेला पूल बांधायचा असेल तर लोखंडी पूल बांधावा ज्यामुळे वृक्ष देखील वाचतील. - अमित सिंग (पर्यावरण प्रेमी)