खाण, क्रशरच्या धुळीचे नियम पाळण्याबाबत लोणीकंद पाठोपाठ भावडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ आक्रमक
ग्रामपंचायतीने क्रशर व्यावसायिकांना बजावल्या नोटीसा ; कारवाईचा दिला इशारा
सुनील भंडारे पाटील
खाण व क्रशर मधून उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण न मिळविणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा निर्णय लोणीकंद ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आल्यानंतर भावडी ग्रामस्थ देखील आक्रमक झाले असून ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार भावडी ग्रामपंचायतीने जवळपास ४० संबंधित व्यावसायिकांना नियम पाळण्याच्या नोटीसा बजावून कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
वाघोली, भावडी, लोणीकंद या गावांमध्ये खाणी व क्रशर उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या क्रशरमधून व वाहतुकीवेळी उडणारी धूळ तसेच व्यावसायिक प्रदूषणाच्या बाबतचे नियम पाळत नसल्याने लोणीकंदचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. लोणीकंद ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा घेऊन नियम न पाळणाऱ्या खाण व क्रशर उद्योजकांवर एनओसी रद्द करण्याचा इशारा दिला आहे.
भावडी ग्रामस्थांना देखील अनेक वर्षांपासून धुळीचा त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतीने संबंधित व्यावसायिकांना नोटीसा बजावून नियम पाळण्याबाबत १५ दिवसांची मुदत दिली आहे. नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कारवाईचा इशारा नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.