पुणे जिल्हा प्रतिनिधी
पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे आज रविवार दिनांक१० रोजी भूमिपूजन व उदघाटन पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री- अजितदादा पवार, उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
वारजे येथील प्रभाग क्र. 30 मध्ये उभारण्यात येणार्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन तसेच
घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे (ROB II) लोकार्पण
तसेचघोरपडी येथे पुणे-मिरज रेल्वे लाईनवर नव्याने उभारण्यात येणार्या उड्डाणपुलाचे (ROB I) भूमिपूजन करण्यात आले व वारजे येथील समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले तसेच वारजे येथील स.नं. व लगतच्या सं.नं. मधून जाणार्या 24 मी. डी पी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. या रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ 1.25% असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. यासोबतच गोरगरिबांसाठी 10% बेड्स मोफत ठेवण्यात आले असून 6% बेड्स हे शासकीय दराने उपलब्ध असणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील असे यावेळी माध्यमांना बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तसेच वारजे येथे उत्तम दर्जाचे पोलीस स्टेशन ही उभारण्यात येणार आहे, त्यासाठी महानगरपालिके कडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी भूमिपूजन केलेल्या घोरपडी परिसरातील नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडी दूर होणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याने या भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.