लोणी काळभोर प्रतिनिधी
पुणे:जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, या प्रकारानं खळबळ उडाली आहे. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना चुकीच्या गटाचे रक्त देण्यात आलं आहे. त्यामुळे दोन रुग्णांची तब्येत खालावली असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्याची वेळ आली आहे.धक्कादायक बाब म्हणजे ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील औंध परिसरात असलेल्या जिल्हा रुग्णालयात घडली आहे.
या घटनेसंदर्भात बोलताना औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यल्लमपल्ली यांनी म्हटलं की, रुग्णालयातील परिचारिकेच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. संबधित परिचारिकेला निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. यल्लमपल्ली यांनी दिली.
औंधच्या इंदिरा वसाहतीत राहणारे दत्तू सोनाजी सोनवणे यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तर वाकडमधील रुग्ण दगडु कांबळे यांना देखील उपचारासाठी याच रुग्णालयात भरती करण्यात आले होते. या दोघांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रक्तपुरवठा करण्याचा सल्ला दिला.
सोनवणे यांचा ब्लड ग्रुप हा ए पॉझिटिव्ह होता, तर कांबळे यांचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह होता.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन्ही रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला, मात्र निष्काळजीपणामुळे दत्तू सोनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असताना त्यांना बी पॉझिटिव्ह रक्त पुरवण्यात आले, तर कांबळे यांचा यांचा रक्त गट बी पॉझिटिव्ह असताना त्यांना ए पॉझिटिव्ह रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं आहे. दोन्ही रुग्णांना रक्त चढवत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत होत्या, आणि त्यामुळेच असा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.