अर्थपूर्ण संबंधामुळे विनाकरार सुरू आहे दारूचे दुकान
वाईन शॉप स्थलांतरीत करण्याची लेखी निवेदनाद्वारे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे मागणी
वाघोली : प्रतिनिधी
वाघोली-आव्हाळवाडी रोडवर असलेल्या वाईन शॉपचा करार संपून देखील काही महिने उलटले असताना वाईन व्यावसायिक गाळा खाली करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. काही महिन्यांपासून भाडे सुद्धा देत नसल्याने गाळा मालक आर्थिक संकटात सापडला आहे. पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गाळामालकाने वारंवार दुकान स्थलांतरित करणे बाबत तक्रारी देऊन सुद्धा अद्यापही दुकान व्यवसायिकाने दुकान स्थलांतरित केले नाही. त्यामुळे दुकान तात्काळ स्थलांतरित करून गाळा मालकाचे भाडे देण्यात यावे अशी मागणी श्रीमंत गणेश तरुण मंडळाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी लेखी निवेदनाद्वारे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे केली आहे.
वाघोली-आव्हाळवाडी रोडवर २०१७ मध्ये उर्मिला अगरवाल यांच्या गाळ्यामध्ये वाईन व्यावसायिकाने पाच वर्षांचा करार करून दुकान सूरू केले. परंतू पाच वर्षे उलटले आणि करार संपला. त्यामुळे काही महिन्यांपासून थकीत भाडे देऊन दुकान स्थलांतरित करावे असे गाळा मालकाने सांगीतले. मात्र याकडे दुर्लक्ष करत राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे वाईन व्यावसायिक दुकान स्थलांतरित करण्यास टाळाटाळ करीत आहे. गाळा मालकांनी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी केल्या.
परंतु तरी देखील वाईन व्यवसायिक दुकान स्थलांतरित न करता उलट गाळा मालकाशी अरेरावी करुन गाळ्याचा ताबा देत नसल्याने अखेर गाळा मालकाने श्रीमंत गणेश तरुण मंडळाचे संदीप थोरात यांच्याकडे धाव घेऊन मदतीची मागणी केली. त्यानुसार संदीप थोरात यांनी पोलीस स्टेशनसह राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क करून गाळा मालकाला न्याय द्यावा अशी मागणी केली.
तरी देखील राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांकडून दाद मिळत नसल्याने अखेर संदीप थोरात यांनी लेखी निवेदनाद्वारे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे दुकान स्थलांतरित करून आर्थिक संकटात सापडलेल्या गाळा मालकाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.
प्रतिक्रीया :
वाईन शॉपचे स्थलांतरितचे आदेश झाले आहेत. परंतु आलेल्या तक्रारींचे निवारण झाल्यानंतर दुकान स्थलांतरित केले जाणार आहे. - संजय कोल्हे (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क)
प्रतिक्रीया :
पाच वर्षांपूर्वी वाईन शॉपला करारनामा करून गाळा देण्यात आला होता. करारनामा संपल्याने दुकान स्थलांतरित करण्यात यावे अशी विनंती केली होती. परंतू पाच वर्षे उलटून देखील दुकान स्थलांतरित करण्यात आले नाही. गेली सात महिन्यांपासून भाडे सुद्धा दिले नाही. त्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. बँकेचा हप्ता व उपजीविका कशी चालवायची असा आमच्यापुढे प्रश्न उभा आहे. वारंवार राज्य उत्पादन शुल्क विभागाशी व पोलिसांशी तक्रार करून देखील अद्यापही न्याय मिळाला नाही - मंगेश अग्रवाल (गाळा मालक)
प्रतिक्रीया :
दुकानाचा करारनामा संपलेला असताना राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाकडून कारवाई करण्यास दुर्लक्ष केले जात आहे. न्यान न मिळाल्याने आत्मदहन करण्याच्या घटना वाढल्या आहेत. लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये तीन घटना घडल्या असून यामध्ये एका तरुणाला न्याय न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. - संदीप थोरात (अध्यक्ष, श्रीमंत गणेश तरुण मंडळ, वाघोली)