गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळं या सणाचं महत्त्व अधिक आहे.
हिदू कॅलेंडरनुसार चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळं या दिवशी लोक नवीन वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देत असतात. चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याच्या सणाला नव्या वर्षाची सुरुवात मानली जाते. यंदाचा गुढीपाडवा हा 9 एप्रिल 2024 ला साजरा होत आहे. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्री रामाने बालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हाच विजयोत्सवाचा दिवस,
भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. ही गुढी का उभारली जाते? गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात? गुढी उभारण्यापूर्वी ब्रम्हदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात? सर्वकाही दडलंय या कथांमध्ये, तेव्हा या पौराणिक कथा सर्वांना माहित असायलाच हव्यात.
शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. शक सुरु करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी पंचाग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे.
गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते. यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे.
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे "सत्य-युगाची" सुरुवात झाली आणि म्हणुनच नुतन वर्षारंभ म्हणुन चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात. या दिवशी विश्वातिल तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जीत होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधीक संचित करायचा प्रयत्न करतो.
वर्षप्रतिपदेला गणपतीचं, देवादिकांचे स्मरण आणि पूजन केलं जातं. त्याचबरोबर या सणानिमित्त वडिलधाऱ्यांनाही वंदन करायला हवं, अशी रुढ प्रथा आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करतात. संवत्सर फल म्हणजे पाडव्यापासून नवीन वर्ष सुरु होत असते, त्यामुळं वर्षाच्या पहिल्या आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती. जसं की वार, चंद्र, नक्षत्र सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेशांमध्ये संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलामध्ये देशकालाचाही निर्देश असतो, देशाच्या कोणकोणत्या भागात सुखसमृद्धी असेल त्याची माहिती संवत्सर फलाच्या माध्यमातून मिळते.
गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी हे विजयाचं प्रतिक मानलं जातं. या सणाला प्रत्येकजण बांबूच्या सहाय्यानं आपल्या घरात उंच गुढी उभारतो. ही गुढी रेशमी वस्त्र, फुलांचा हार, कडूनिंबाचा पाला आणि तांब्यानं तयार केली जाते. यावेळी गुढीला गंध आणि फुलं वाहिली जातात. त्याचबरोबर निरांजन लावून उदबत्ती दाखवली जाते. दुपारी गोड नैवेद्य दाखवल्यानंतर संध्याकाळी हळद, कुंकू आणि फुलं वाहून गुढी उतरवली जाते.