पुणे जिल्हा प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निरगुडे तलाठी कार्यालयात गाव कामगार तलाठी म्हणून श्रीमंत फत्तेसिंह दराडे हे कामकाज पहातात, परंतू तलाठी म्हणजे सज्जातील अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे. तलाठी नेमणुकीच्या गावात वाराच्या दिवशी उपस्थितीत राहणे अपेक्षीत आहे परंतू तेथे न थांबता शेटफळगडे तलाठी कार्यालयातूनचं इतर दोन गावांचा कारभार ते बघत आहेत. त्यामुळे निरगुडे व म्हसोबाचीवाडी या दोन गावातील ग्रामस्थांची मोठया प्रमाणात परवड होत आहे.
गावातील लोकांना तलाठी कार्यालयातून उत्पन्नाचा दाखला, रेशनिंग कार्ड मधील नाव कमी करणेचा दाखला तसेच इतर दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाच्या खेट्या माराव्या लागतात तसेच मुलांच्या शिक्षणासाठी तलाठी कार्यालयाचे वेगवेगळे दाखले हे लागत असतात परंतू ते आपल्या सज्जात उपस्थित राहत नाहीत तसेच त्यांच्याकडून काळजीपूर्वक कामाची सर्व सामान्यांची माफक अपेक्षा असतानाही त्याचे त्यांना गांभीर्य राहीले नाही. त्याबाबत अनेक तक्रारी ग्रामस्थ हे करत आहेत. मात्र, तलाठ्यांच्या मनमानीला कोणीच रोखू शकत नाही, तसेच या मुद्द्यावर महसूल प्रशासनाने योग्य ती पावले उचलावी अशी मागणी सर्व सामान्यांतून जोर धरू लागली आहे.
ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी तलाठी सज्जे उभे केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधली आहेत. मात्र, बहुतांशी तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहातच नाहीत. शेतीसह अन्य कामांसाठी तलाठी कार्यालयातून सातबारा, खाते उतारा, विविध प्रकारचे दाखले, दाखले घेण्यासाठी ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. विद्यार्थी, नोकरदारांना विविध भरती प्रक्रियेसाठी प्रमाणपत्र, रहिवाशी, कुटुंब मर्यादा प्रमाणपत्र लागतात.
तसेच ती कागदपत्रे मिळविण्यासाठी तलाठ्यांचा शोध सुरू असतो. तलाठी मात्र आज इथे तर उद्या तिथे अशा घिरट्या घालायला लावतात. तलाठी हे मोबाईल बंद ठेवतात किंवा चालू असले तरी उचलत नाहीत. कोतवालानाही व्यवस्थित माहिती सांगत नाही. परिणामी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.