पुणे जिल्हा प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतीमालाचा पडलेला भाव महायुतीच्या दारुण पराभवासाठी कारणीभूत ठरला आहे. तसेच इथेनाॅल बंदी, उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंदी हे सुद्धा शेतकऱ्यांच्या मुळावर आल्याने जबरदस्त फटका बसला आहे.
लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी महायुतीला जबरदस्त फटका बसला आहे. राज्यातील ४८ पैकी ३० जागा जिंकत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवला आहे. सांगलीचे विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा देत काँग्रेसचे सदस्य बळ १४ वर नेहले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. त्यांनी १३ जागा जिंकल्या असून. ठाकरे गटाला ९ जागा मिळाल्या आहेत. तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाला ८ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात काँग्रेसचा नव्याने झालेला उदय हा सुद्धा त्या पक्षाला आशेचा किरण ठरला आहे. जो पक्ष मरणासन्न अवस्थेत गेलेला होता त्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत मारलेली मजल पाहता कार्यकर्त्यांना चांगलेच बळ आले आहे. महायुतीमध्ये लोकसभेला भाजपाला नऊ जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेना शिंदे गटाला सात जागा मिळाल्या आहेत. तसेच अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये जबरदस्त फटका बसला आहे.
मराठवाड्यामध्ये झालेली पीछेहाट याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टर असला, तरी पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, या लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीला जबरदस्त दणका बसला आहे. तसेच पुण्याची आणि सातारची जागा महायुतीला मिळाली होती. सातारची जागा उदयनराजे भोसले यांनी जिंकली असली तरी तो आनंद व्यक्त करण्यासारखे समाधान देणार नाही. त्यामुळे सहकार पट्ट्यामध्ये महायुतीला जबरदस्त दणका बसला आहे.
केंद्रामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन झाल्याने मंत्र्यांचा शपथविधी होऊन खातेवाटप करण्यात आली आहेत. राज्यात सहा मंत्रिपदे मिळाली आहेत. भाजपकडून पियूष गोयल, नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे. मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदारास आठवले यांनी राज्य मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच मुरलीधर मोहोळ यांना सहकार आणि नागरी विमान वाहतूक या मंत्रालयाच्या राज्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून शपथ घेतलेले एकमेव मंत्री आहेत. त्यांच्या दिमतीला सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शहा हे असतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात या खात्याची निर्मिती करून अमित शहा यांचेकडे जबाबदारी देण्यात आली होती. मराठवाड्याला आणि कोकणला मंत्रीमंडळात संधी मिळालेली नाही. पश्चिम महाराष्ट्रातून मराठा चेहरा असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदी संधी देण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्रात सहकारात पाय घट्ट करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांचे रिपोर्टिंग अमित शाह यांना असेल. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये भाजप नेते, तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीचा संबंध सर्वसामान्य शेतकऱ्यांसह चुलीपर्यंत असल्याने पतसंस्था, राज्य सहकारी बँक, जिल्हा बँका यांचं राजकारण याच पट्ट्यांमध्ये आहे. बहुतांश अर्थकारण या संस्थांमधून होत असतं. या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या पट्ट्यामध्ये बस्तान बसवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आल्याचे समजते. आपल्या सर्व संस्थांवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच प्राबल्य राहिले आहे.