आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
निर्जला एकादशी निमित्त परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी भक्तिमय उत्साहात साजरी करण्यात आली. तीर्थक्षेत्र आळंदीत नेहमी हजारो भाविकांची श्रींचे दर्शनास होणारी गर्दी यावेळी वाढलेली पाहण्यास मिळाली. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रींचे वैभवी थेट दर्शन व्यवस्था आळंदी संस्थानने सोशल मीडियाचे माध्यमातून केली.
आळंदी मंदिरात एकादशी निमित्त श्रींचे वैभवी गाभा-यात लक्षवेधी पुष्प सजावट करण्यात आली होती. या निमित्त मंदिरात हरिपाठ, कीर्तन सेवा, हरीजागर सेवा होत असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य असे धार्मिक कार्यक्रम झाले. मंदिरा बाहेर तसेच इंद्रायणी नदी घाटावर भाविकांची गर्दी होती. अनेक भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी नदीत स्नान करून येथील तीर्थक्षेत्रीचे स्थान महात्म्य जोपासले. भाविकांनी इंद्रायणीचे पाण्याने आचमन करीत दर्शनास गर्दी केली. वारकरी , भाविकांनी महाद्वारातून श्रींचे मुख दर्शन घेत नगरप्रदक्षिणा करीत स्थान माहात्म्य जोपासले. आळंदीत नगरप्रदक्षिणा मार्ग आणि महाद्वारात मात्र थेट रस्त्यावर वाहने लावल्याने रहदारीला अडथळा झाला. नगरप्रदक्षिणा मार्गावर काही ठिकाणी दुतर्फ़ा वाहने लावली गेल्याने दुतर्फ़ा आलेल्या वाहनांना मार्ग काढण्यास वेळ लागला. यामुळे प्रदक्षिणा मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस विभागाने दक्षता घेत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली. बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीला अडथळा झाला. मात्र पोलीस प्रशासनाने तात्काळ वाहतूक सुरळीत करून रहदारीत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत परिश्रम घेतले.