इंदापूर प्रतिनिधी
कुणबी मराठा जात व वैद्यता प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाज इंदापूर तालुक्याच्या वतीने बंडू गोपाळ ननवरे यांनी सोमवार दिनांक १५ जुलैपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. कर्तव्यदक्ष म्हणून ओळख असणारे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
कुणबी नोंदीच्या वंशावळ काढण्यासाठी मागणी अर्ज केल्यानंतर ८ दिवसांच्या आत वंशावळ मिळावी तसेच तालुक्यात प्रत्येक मंडल अधिकारी कार्यालयात आठवड्यातून एक दिवस कुणबी प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर घेण्यात यावे तसेच कुणबी मराठा जात व वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बंडू ननवरे यांचे इंदापूर तहसील कार्यालय समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी उपोषण व निवेदनाच्या अनुषंगाने लेखी पत्र देत आश्वासन दिले तहसील कार्यालयामार्फत अभिलेख कक्षा मधील मोडी भाषेतील तसेच जुन्या कुणबी नोंदीबाबतचे असलेले अभिलेख हे यापूर्वीच गावनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तसेच अभिलेख कक्ष हे तालुक्याचे ठिकाणी असल्यामुळे कुणबी जातीचे प्राप्त होणाऱ्या आर्जांची छाननी ही तालुकास्तरावर होत आहे. त्याबाबत मंडलनिहाय शिबिर आयोजित करता येऊ शकत नाहीत तरी या कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या कुणबी जातप्रमाण प्रकरणावर वंशावळींवरही तातडीने कार्यवाही होत आहे.
यापुढेही याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल कुणबी जात प्रमाणपत्रासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत आहे तसेच या कक्षामध्ये संबंधित अर्ज धारकास आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करून त्यांना सर्व कागदपत्रे देण्याकामी सहकार्य करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल असे या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदरील आंदोलन हे तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे.