मायेचे छत्र हरपले कै,श्री, दत्तात्रय रामचंद्र भूमकर
आण्णा या नावाने संपूर्ण पुणे जिल्हा ज्यांना आदराने ओळखतो ते म्हणजे कै.श्री.दत्तात्रय रामचंद्र भुमकर उर्फ आण्णा,यांचा जन्म १ जून १९५० रोजी लोणीकंद येथे एका सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात झाला.त्यांचे वडील कै.रामचंद्र गेणुजी भुमकर हे लहान असतानाच आण्णाच्या आजोबांचे निधन झाले.त्यामुळे आण्णांचे आई व वडील दोन्हीही आण्णांच्या मामाच्या गावी लोणीकंद येथे मामाची शेती करून आपला उदरनिर्वाह करीत होते.अशा प्रतिकुल परिस्थीतीमध्ये आण्णांचा जन्म झाला.
घरच्या हलाखीच्या व प्रतिकुल परिस्थीतीमुळे आण्णांना लहानपणी कधी नवीन कपडे सुद्धा घालावयास मिळाले नाही.जुनी,फाटलेली कपडे अंगावर घालुन आण्णांनी दिवस काढले.त्यामुळे अशा गरीब परिस्थितीत त्यांचे शिक्षण फारसे झाले नाही.ते फक्त दुसरीपर्यंत शिकलेले आहेत.परंतु मूळची अंगातील गुणवत्ता व कष्ट करण्याची जिद्द यामुळे आण्णांनी कोणत्याही प्रकारची संकोच न बाळगता कष्ट किंवा काम करण्यास कधीही मागे पुढे पाहिले नाही.
लहान वयात जेंव्हा खेळण्या बागडण्याचे वय होते तेंव्हाच वडिलांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक व्यवसायात वडिलांच्या बरोबरीने आण्णा काम करत होते.त्यांच्या वडिलांचे किराणामालाचे दुकान होते,आण्णा किराणामालाच्या दुकानावर काम करित होते.तसेच वडिलांच्या लाकडाच्या वखारीवर सुद्धा ते काम करत.
आण्णांनी लोणीकंद येथील कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.स्वतःमध्ये असणारी व्यवसायिक कार्यकुशलता व वडिलांकडून मिळालेले व्यवसायाचे बाळकडु याच्या जोरावर त्यांनी वेगवेगळ्या नवीन व्यवसायात पदार्पण केले, आणि प्रत्येक व्यवसायात भरभरुन यश संपादन केले.त्यातुन भुमकर कुटुंबाला एक वेगळी व्यावसायिक ओळख मिळाली.त्यातूनच पुढे एक आदर्श उदयोजक म्हणून आण्णा पंचक्रोशीमध्ये नावाजले जाऊ लागले
दरम्यान ५ सप्टेंबर १९८४ साली आण्णांचे वडील कै.रामचंद्र गेणुजी भूमकर म्हणजे दादा यांचे निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची व सर्व भावंडांची कौटुंबिक जबाबदारी आपल्या खांदयावर घेऊन आण्णांनी आपला जीवनप्रवास सुरू केला. लहानपणापासूनच कुटुंबाप्रती व भावंडाप्रति असणारे प्रेम,जिव्हाळा व असणारी एकात्मता जपलेल्या अण्णांनी आपल्या भावंडाचा उत्तम सांभाळ केला. त्यामुळे त्यांचे बंधू त्यांचे नाव आदराने आण्णा म्हणतात. सर्वसामान्य परिस्थितीमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. तेव्हा आण्णांनी निश्चय केला की ज्या कारणामुळे मला शिक्षण घेता आले नाही त्या कारणामुळे माझ्या भावंडाचे शिक्षण थांबू नये. माझ्या भावंडांना मी उच्चशिक्षित करणार म्हणून त्यांनी रात्रंदिवस कष्ट करून आपल्या भावांना उच्चशिक्षित केले.आपल्या भावंडांना उच्चशिक्षित केल्यानंतरही आण्णांनी आपली वाटचाल थांबवली नाही, तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसायामध्ये पदार्पण करण्याची जिज्ञासा त्यांनी आपल्या भावंडांमध्ये रुजवली.
पुढे वाळू व्यवसायात कार्यरत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये १९९६ साली लोणीकंद गावात पहिल्यांदा खाण उद्योग आण्णांनी सुरू केला.त्यावेळी खाण व्यवसायामध्ये वाघोली गावचे वर्चस्व होते पण तरीही आण्णांनी १९९८ साली लोणीकंद मध्ये क्रशर व्यवसाय सुरू केला. तसेच २००५ साली श्री रामचंद्र सर्व्हिस स्टेशन नावाने पेट्रोल पंप सुरू केला.२००८ साली श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना आण्णांनी केली, व त्या संस्थेमध्ये खजिनदार या पदावर आजपर्यंत काम करत राहिले. आज श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीच्या नावाने सुरू असणाऱ्या शिक्षण संकुलामध्ये श्री रामचंद्र कॉलेज इंजिनिअरिंग- डिग्री डिप्लोमा व एम.ई.,तसेच न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूल (CBSE बोर्ड पहिली ते बारावी),श्रीमती समुद्राबाई रामचंद्र भुमकर सायन्स ज्युनियर कॉलेज, श्रीमती समुद्राबाई रामचंद्र भुमकर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, श्री रामचंद्र हॉस्टेल, श्री रामचंद्र ट्रान्सपोर्ट सुरू आहेत.२००९ साली मेटसो कंपनीचा २५० टी.पी. एच. क्षमतेचा क्रेशर प्लॅन्ट आण्णांनी सुरू केला. श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखाना सुरू होत असताना ५० मुख्य प्रवर्तकामध्ये एक प्रवर्तक म्हणून आण्णांनी उत्तमरीत्या काम केले. २०१२ साली सामाजिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या आण्णांनी माहेर संस्थेतील दोन गरीब मुलींचे लग्न लावून दिले. तसेच त्यांना लग्नानंतर सर्व संसारउपयोगी वस्तू देऊन त्यांचा संसार थाटात सुरू केला.
लोणीकंद गावांमधील सामाजिक कार्यामध्ये आण्णांनी हिरीरीने सहभाग घेतला. त्यामध्ये गावातील यात्रा , हरिनाम सप्ताह, दहीहंडी उत्सव यामध्ये आण्णांनी स्वतः मदत व सामाजिक कार्य केले. संत सावतामाळी मंदिर उभारणीमध्ये आण्णांनी भरीव कार्य केले.
श्री साईबाबा पालखी, शिरूर - हवेली दिंडी यासारख्या धार्मिक कामांमध्ये अन्नदानाचे काम आण्णांनी स्वतः उभे राहून केले. कोरोना काळामध्ये गरीब कुटुंबाला वाड्या वस्त्यांवर जाऊन अन्नधान्य व जीवनावश्यक वास्तूचे वाटप आण्णांनी केले.त्यातून पुढे त्यांच्या कुटुंबाला समाजात व राजकारणात एक नवीन ओळख मिळाली. आज केवळ आण्णाच नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती आदर्श उद्योगपती म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये नावाजलेले आहेत.या सर्व आण्णांच्या जीवनप्रवासामध्ये त्यांच्या पत्नी श्रीमती कुसुम दत्तात्रय भुमकर यांनी त्यांची बरोबरीने साथ दिली.
शेवटी आण्णा या व्यक्तिमत्वाची व्याख्या एक आदर्श समाजसेवक, आदर्श उद्योगपती आदर्श शिक्षण महर्षी आणि आदर्श पितृतुल्य बंधुकर्तुत्व असंच म्हणावं लागेल.
लोखंडाचं सोनं करणारे परिस आहेत आण्णा प्रतिकुलतेला अनुकुलतेमध्ये बदलणारा प्रकाश आहेत आण्णा ,
कल्पक दूरदृष्टी असणारे व्यक्तीमत्व आहेत आण्णा,अनाकलनीय बुद्धिमत्तेचे प्रतिक आहेत.अशा या आण्णांनी आयुष्यभर कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडली.सोमवार दि १५ जुलै २०२४ रोजी आण्णांची प्राणज्योती मालवली.
आदरणीय स्व.आण्णांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती कुसुम दत्तात्रय भुमकर,त्यांचे तीन भाऊ उद्योजक उद्धव रामचंद्र भुमकर,श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती रामचंद्र भुमकर,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे शंकर रामचंद्र भुमकर तर दोन मुले प्रसिद्ध उद्योजक पांडुरंग दत्तात्रय भुमकर,प्रसिध्द उदयोजक,श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी स्वप्नील दत्तात्रय भुमकर,तसेच दोन मुली सिमा भरत आल्हाट,सारिका राहुल पारखे,तीन पुतणे गौरव मारुती भुमकार,सिद्धांत शंकर भूमकर,अथर्व मारुती भुमकर नातवंडे,पतवंडे असा मोठा गोकुळासारखा परिवार आहे.
|| अन्नाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रध्दांजली..||
शब्दांकन:- मारुती(बापू) रामचंद्र भूमकर (संस्थापक-श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी तथा प्रसिद्ध उद्योजक