आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
येथील मुक्ता देवी शिक्षण प्रसारक मंडळ, पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी वारीचे निमित्ताने शालेय बाळ गोपाळांचा पालखी सोहळा हरिनाम गजरात साजरा झाला. आळंदी परिसरांतील विविध शाळांत नामजयघोषाने परिसर दुमदुमला.
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी आणि विठू नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात शाळेच्या परिसरात दिंडी सोहळा रंगला. श्री विठ्ठल रखुमाई, श्री संत तुकाराम महाराज आदी संतांचे वेशभूषा केलेले विद्यार्थी सोहळ्याचे आकर्षण ठरले.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आंळदीमध्ये आषाढी एकादशीचे पूर्व संध्येला दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास अनेकांना झाला. ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. वारकरी वेशातील मुले पालखी चे मुख्य आकर्षण होते.
संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, संचालिका किर्ती घुंडरे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर, विजय धादवड, अक्षय चपटे यांचे हस्ते पालखीतील माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व शिक्षकांनी देखील पालखी सोहळ्यात आनंदाने सहभाग घेतला. विद्यार्थी आणि शिक्षकांनी फुगडी खेळून प्रत्यक्षात श्री क्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण शाळेच्या क्रीडागंणावर अनुभवले.