शिरुर येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना दादा पाटील फराटे म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे मागितली आहे.
उमेदवारी मिळाल्यास निवडणूक सर्व ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले. घोडगंगा सहकारी साखर चालू करण्याबाबत प्राधान्य राहील असे फराटे म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार ॲड.अशोक पवार यांच्या कडून सांगण्यात येते की आपण अजितदादा पवार गटात न गेल्याने कारखान्याच्या कर्जाच्या संदर्भातील निर्णय होत नाही.
हा अजितदादा पवार यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोप खोटा आहे. कर्ज प्रस्ताव हा वेळेत सादर करावा लागतो व त्यात काही त्रृटी असतील तर वेळेत त्रृटी दुरुस्त करुन प्रस्ताव सादर करावा लागतो. कर्ज तोंड पाहून नाही तर व्यवहार व फाईल पाहून दिले जाते. त्रृटी, दूर करायच्या नाहीत व आरोप करायचे हे बरोबर नाही असे फराटे म्हणाले. २५ वर्ष कारखान्याची एकहाती सत्ता असताना व उसाचे मोठे क्षेत्र कारखाना कार्यक्षेत्रात असतानाही घोडगंगा कारखाना अडचणीत का? असा सवाल फराटे यांनी उपस्थित केला.
खाजगी साखर कारखान्यावर निष्ठा व सहकारी कारखान्यांशी गद्दारी असे नको असे ही फराटे म्हणाले. शिरुर तालुक्यातील विविध विकासकामे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मार्गी लावली आहेत. शिरूर हवेली मतदार संघात दादांच्या विचारांना माननारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्याने दादांच्या विचाराचा उमेदवार शिरुर मधून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करीत घोडगंगा साखर कारखान्याचा आजच्या परिस्थितीचा अजितदादा पवार यांच्यावर ठपका ठेवू नका.
कारखाना सुस्थितीत असताना मयत कामगारांना इतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कपात करून जवळपास 92 लाख रुपये कारखान्याने मयत सभासदांचे सात आठ वर्षश्राद्ध झाले तरी त्यांच्या वारसांना का दिले नाही. अंदाजे पाच हजार मयत सभासदांच्या वारस नोंदी न करण्याचे षड्यंत्र कशासाठी आहे. कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाहीत की ऊस तोड कामगार, ट्रॅक्टर चालक यांना पैसे दिले नाहीत. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर कारखान्याने कर्ज काढून ते थकीत ठेवले त्यामुळे शेतकऱ्यांचे सीबील खराब झाल्याने शेतकऱ्यांना कोणतीच बँक दारात उभा करत नाही याला जबाबदार कोण? अशोक पवारांनी घोडगंगा करखाण्याच्या ब्रॉयलर पेटवण्याच्या कार्यक्रमास तीन वेळा बोलावून तिन्ही वेळेस उसाला बाजार भाव वाढवून देऊ असे पवार साहेबांसमोर सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आमदारांनी फसवले आहे असा आरोप यावेळी दादा पाटील फराटे यांनी केला.
घोडगंगाचा आजच्या परिस्थितीला ॲड. अशोक बापू पवार जबाबदार असल्याचे फराटे यांनी सांगितले .
घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा राजकारणाचा अड्डा नाही असे म्हणत घोडगंगा सहकारी साखर कारखाना तोट्यात गेला कसा असा सवाल घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक दादापाटील फराटे यांनी उपस्थित केला.
दादा पाटील फराटे यांची राजकीय पार्श्वभूमी
दादा पाटील फराटे यांचा राजकीय जीवनप्रवास मांडवगण फराटा गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून 1992 साली सुरू झाला. ते 1997 साली घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून निवडून आले. तसेच त्यांनी कारखान्यावर सलग आठ वर्षे व्हा. चेअरमन म्हणून काम पाहिले. त्यांचे चुलते कै. मल्हारराव फराटे पाटील हे सोसायटीचे चेअरमन होते. तर मांडवगण गावच्या सध्याच्या सरपंच समीक्षा फराटे या त्यांच्या सुनबाई आहेत. अजित दादा पवार हे शिरूर लोकसभेतून प्रथम उभे राहिल्यानंतर त्यांच्या राजकीय जीवनास सुरुवात झाली. शिरूर हवेली मतदार संघातून स्व.बाबुराव पाचर्णे यांचे तिकीट कापल्यानंतर पाचर्णे साहेबांबरोबर त्यांनी अख्खा मतदार संघ पिंजून काढत बाबुराव पाचर्णे यांना मोठा आधार देण्याचे काम त्यांनी केले. सलग तीन पंचवार्षिक निवडणुकी मध्ये दादा पाटील फराटे हे पाचर्णे साहेबांचे निवडणूक प्रचार प्रमुख होते त्यामुळे त्यांना हा मतदार संघाबाबत सविस्तर माहिती आहेच व त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.
उमेवारी का मिळावी? व मतदार संघाबाबत काय संकल्पना आहेत?
माजी आमदार स्व. बाबूरावजी पाचर्णे यांच्या नंतर तालुक्यातील जनतेचे काम करण्यासाठी कोणाचा तरी वरदहस्त पाहिजे असतो यासाठी अजीत दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये मी प्रवेश केला आहे. या अगोदरच्या माझ्या राजकीय जीवनात पवार साहेब आणि अजीत दादा यांच्याबरोबर मी काम केलेले आहे. शिरूर हवेली मतदार संघाची जागा ही अजीत दादा गटाची मानली जात असल्याने व शिरूर हवेलीच्या लोकांची आता माझ्या उमेदवारीची मानसिकता झाल्याने मी या जागेसाठी इच्छुक असून याबाबत मी दादांशी बोललो आहे. जर महायुतीकडून मला उमेदवारी मिळाली तर नक्कीच आमचे सर्व मित्र पक्ष मला साथ देतील याबाबत माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही.
शिरूर हवेलीच्या जनतेसाठी काय काय योजना मनामध्ये आहेत?
शेतकऱ्यांची कामधेनू घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करणे, मतदार संघातील अनेक रस्त्यांची कामे करणे गरजेचे आहे, पुणे नगर रोडवरील वाघोली येथील वाहतुकीचा प्रश्न सोडवणे, सोलापूर पुणे रोडवरील उरुळी कांचन ते पुण्यापर्यंतची जी वाहतूक कोंडी होते त्याबाबत उपाय योजना करणे, चासकमान व खडकवासला पाणी व्यवस्थापन करून शेतकऱ्यांना मुबलक आवर्तन मिळवून देणे, शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. रांजणगाव पंचतारांकित एमआयडीसी मधील गुंडशाही मोडीत काढून स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात सभागृहात विशेष कायदा करण्यासाठी पुढाकार घेणार तसेच शिरूर शहर एमआयडीसी मुळे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्या अनुषंगाने शिरूर शहराचा विकास करून डम्पिंग ग्राउंड आणि घनकचरा व्यवस्थापन योग्य रीतीने करून प्रदूषण मुक्त शहर करण्याचा मानस आहे. तसेच मतदार संघातील विविध खेडेगावामध्ये कार्डियाक रुग्णवाहिका शासनातर्फे देण्यासाठी प्रयत्न करणार कारण योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच महिलांसाठी बचत गटामार्फत, व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विशेष ट्रेनिंग देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे यावेळी दादा पाटील फराटे यांनी सांगितले. तसेच शिरूर हवेलीच्या विकासासाठी स्वतःला झोकून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातुन ज्या ज्या विकासाच्या योजना आणता येतील त्या योजना आणून तालुक्यातील जनतेला एक आपला हक्काचा आणि आपला आमदार म्हणून काम करणार आहे.
अजितदादा पवार हे शिरूर मतदार संघातून उभे राहणार असल्याच्या बातम्या येतात याबद्दल आपले काय मत आहे?
अजित दादा सारख्या माणसाने महाराष्ट्र राज्यातील अनेक सामान्य लोकांना आमदार, खासदार, मंत्री केले आहे. ते एव्हडया छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणार नसून ते शिरूर हवेली मतदार संघातून निवडणुकीला उभे राहणार ह्या साफ अफवा आहेत. पण एवढं नक्की आहे की ते जो उमेदवार देतील त्या उमेवारास जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच निवडून आणतील.