शिरूर प्रतिनिधी
जांबूत: ( ता: शिरूर) जांबूत मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. मुक्ताबाई भाऊ खाडे ( वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे.
खाडे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी घर उघडे असल्यामुळे घरात पाहिले असता.मुक्ताबाई भाऊ खाडे या मिळून न आल्यामुळे आम्ही सर्वत्र त्यांचा शोध घेतला असता. यांच्या चपला दिसल्यामुळे उसाच्या क्षेत्रामध्ये त्यांचा शोध सुरू केला. त्यानंतर वन विभाग यांना कळवल्यानंतर तातडीने वनअधिकारी ,पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. व त्यांचा शोध घेत असता त्यांचा मृतदेह एका उसाच्या शेतात आढळून आला. या घटनेमुळे जांबूत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जांबूत परिसरात बिबटयांचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. जांबूत मध्ये बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले हे सतत वाढत आहेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव पशू व प्राण्यांवर हल्ले होताना दिसत आहे. तसेच त्याचे दर्शन दिवसाही होऊ लागले आहे, यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे खूप गरजेचे आहे. बिबट्याला भक्ष भेटले नाहीतर मनुष्यावर हल्ला करायलाही तो मागेपुढे पाहत नाही. लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. मेंढपाळ, शेतकरी,लहान मुले महिलांमध्ये कमालीची असुरक्षितेची भीती निर्माण झाली आहे.
पाळीव प्राणी बिबट्याच्या भक्षस्थानी या घटना नवीन नाहित. पण बिबट्यांचा झालेला सुळसुळाट यामुळे मानवाला जीव गमवावा लागत आहे. अंगणात, रस्त्यावर, शेतात दबा धरून बसलेला बिबट्या सहजतेने मानवाची शिकार करत आहे.
वाढत्या बिबट्याच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा हा संघर्ष पुढे धोकादायक स्थितीत येऊ शकतो. वेळीच उपाययोजना करण्याची मागणी जांबूत ग्रामस्थांकडून होत आहे.
सदर घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप, पोलीस अंबादास थोरे, पोलीस दीपक राऊत, पोलीस पाटील राहुल जगताप, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, माजी सरपंच दामूअण्णा घोडे राजेंद्र गावडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप ,वनपाल गणेश पवार, वनपाल गणेश मेहेत्रे , वनरक्षक लहू केसकर , वनरक्षक नारायण राठोड. रेस्क्यू टीम पिंपरखेड बेस कॅम्प आदी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.