शिरूर पोलीस स्टेशन मधील घटना
या घटनेनंतर काही शिक्षकांसह तब्बल १७ जणांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल
सुनील भंडारे पाटील
शिरूर पोलीस स्टेशन मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामध्ये एका महिलेने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे,
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घराशेजारील शाळेत रात्रीच्या वेळेस डीजे चा आवाज चालू असल्याने व त्याचा आपल्या मुलांच्या अभ्यासात अडथळा येत असल्याने जाब विचारायला गेलेल्या महिलेला व तीच्या तरूण मुलाला शाळेत शिवीगाळ करून, धमकावल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी शाळेतील शिक्षकासह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. शाळेतील शिक्षक दारूच्या नशेत होते, असा आरोप फिर्यादी महिलेने केल्याने व तक्रार दाखल करण्यास पोलीस मदत करत नसल्याने पोलिस ठाण्यासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने खळबळ उडाली आहे.
सुमन सखाराम साळवे (वय ४४, रा. बगाड रोड, रामलिंग, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश चौगुले व अभिषेक जाधव यांच्यासह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी साळवे यांच्या घराजवळ सेंट जोसेफ इंग्लिश मिडिअम स्कूल असून, दोन महिन्यांपूर्वी (२० जून) रात्रीच्या वेळेस शाळेत डीजे चालू होता. साळवे यांची मुले युपीएससी चा अभ्यास करीत असल्याने अडथळा आला म्हणून त्या मुलगा जीवन साळवे याच्यासह शाळेत जाब विचारण्यास व डीजे चा आवाज कमी करा म्हणून सांगण्यास गेल्या असता तेथील तेथे दहा - बारा जण दारूच्या नशेत आढळले.
हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना दाखवावा म्हणून त्या आपल्या मोबाईलद्वारे या प्रकाराचा व्हिडिओ काढीत असतानाच मुख्याध्यापिका नॅन्सी पायस दोन महिलांसह आल्या व त्यांनी फिर्यादीला तु व्हिडिओ का काढते, असा जाब विचारला. तेव्हा डीजेचा आवाज कमी करा, असे सांगण्यासाठी मी आले होते असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता तु कोण असे म्हणत त्यांनी हिला धरून ठेवा मी पोलिसांना बोलावते असे धमकावत दमदाटी केली. ते सगळे दारूच्या नशेत दिसल्याने फिर्यादीने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला असता एका महिलेने त्यांना लाथ मारली व मोबाईल घेतला.
मुलगा जीवन साळवे याला सुरेश चौगुले याने धक्काबुक्की केली. त्यानंतरही चौगुले व जाधव यांनी फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करून खलास करण्याची धमकी दिली. तुम्ही आमचे काहीच बिघडवू शकत नाही, म्हणत वेळोवेळी त्रास दिल्याने साळवे यांनी शिरूर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली.
पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फिर्यादी महिला मुलगा जीवन याच्यासह बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती सखाराम साळवे यांनी दिली होती. शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्रास दिल्याने निघून जात असल्याचा मेसेज त्यांनी पतीच्या मोबाईलवर पाठविल्यानंतर पोलिसांनी त्याबाबत मिसिंग नोंदवली होती. तर बुधवारी सायंकाळी साळवे यांनी शिरूर पोलिस ठाण्यासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने खळबळ उडाली. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या फिर्यादीवरून सेंट जोसेफ शाळेतील शिक्षक जाधव, मदतनीस चौगुले यांच्यासह १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे
सध्या शिरूर तालुक्यातील पोलीस स्टेशन मध्ये नागरिकांना सन्मान जनक वागणुक मिळत नसल्याने अनेक वेळा नागरिकांना पोलिसांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे कार्यालय गाठावे लागत आहे, तर तेथे निवेदन देऊन ,काही वेळा आंदोलन देखील करावी लागत आहे,तर कधी महिलेला अंगावर डिझेल ओतून घेऊन टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे, त्यानंतर कुठं तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेतली जाते ,त्यामुळे शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ,रांजणगाव, शिरूर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, याबाबत आता पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहे,