पुणे नगर महामार्गावर वाघोली (ता हवेली) येथे खडी क्रशर डंपरचा पुन्हा थरार भरघाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. तर सहा जण जखमी झाले. जखमी मधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या वरती पुण्यात उपचार सुरू आहेत. ही घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर घडली. अपघातावेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैभवी रितेश पवार ( वय १ वर्ष ), वैभव रितेश पवार वय २ वर्ष, रीनेश नितेश पवार, वय ३० वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत.
जखमी झालेल्यांची नावं- . जानकी दिनेश पवार, २१ वर्षे , रिनिशा विनोद पवार १८ , वर्षे रोशन शशादू भोसले, ९ वर्षे नगेश निवृत्ती पवार, वय २७ वर्षे दर्शन संजय वैराळ, वय १८ आलिशा विनोद पवार, वय ४७ वर्षे असून जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत. रविवारी रात्रीच ते अमरावती येथून कामासाठी आले होते. यामध्ये फूटपाथ वर १२ जण झोपले होते. तर बाकी फूटपाथ च्या बाजूला झोपड्यात झोपले होते. मजुरी करणारे हे सर्व कामगार आहेत. भरघाव डंपर सरळ फूटपाथवर चढून झोपलेल्यांच्या अंगावर गेला.
अपघातातील डंपर क्रमांक MH 12 VF 0437 हा असून याच डंपरवरील ड्रायव्हरने दारू पिलेल्या अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे. आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे, 26 वर्षे रा. नांदेड यास ताब्यात घेतला आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वपोनी पंडित रेजितवाड करत आहेत.