सुनील भंडारे पाटील
छावा चित्रपट बघितल्यानंतर समस्त हिंदूंच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. सामान्य हिंदूंची आणि हिंदुत्ववादी संघटनांची एकच मागणी आहे , धर्मवीर शंभूराजांचे हालहाल करणाऱ्या औरंग्याची कबर उध्वस्त करा. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयंत आणि सावध भूमिका घेतली असून सध्या औरंगजेबाची कबर पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून तिला कायदेशीर संरक्षण आहे. अश्या पद्धतीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार आवश्यक आहे असे मत त्यांनी मांडले आहे.
छावा चित्रपट बघून आपले जनमानस इतके अस्वस्थ आणि संतप्त होते याचा अजून एक अर्थ असा सुद्धा निघतो की, आपल्याकडील इतिहासाच्या पुस्तकात गेल्या ७५ वर्षात या पद्धतीने खरा इतिहास संगीतलाच गेला नाही ; जर सांगितला गेला असता तर ती कबर आजवर अस्तित्वात राहूच शकली नसती.
जगातील दहा क्रूरकर्मा राज्यकर्त्यांच्या यादीत ज्याचे नाव नक्की समाविष्ट होईल असा औरंगजेब हा क्रूर ,मनोविकृत राज्यकर्ता होता. त्याला तीन भाऊ होते. दारा शुकोह , शाह शुजा आणि मुराद बक्ष. दारा शुकोह हा सर्वात मोठा भाऊ , गादीचा वारसदार. हा कट्टर नव्हता. याला औरंगजेबाने मारून टाकले आणि त्याचे डोके कापले.
आपल्या बापाला शहाजहानला त्याने आग्र्याच्या किल्ल्यात कैद करून ठेवले होते तिथे बापाला त्याचे डोके त्याने भेट म्हणून पाठवले होते. शाह शुजाला सुद्धा युद्धात पराभूत करून मारून टाकले. मुराद बक्ष याने शहाजहानला कैदेत टाकणे , दारा शुकोह ला मारून टाकणे आणि शाह शुजाला पराभूत करणे या तिन्ही कामांमध्ये औरंगजेबाला मदत केली होती. परंतु सत्ता हातात आल्यावर औरंगजेबाने याला पण मारून टाकण्यात धन्यता मानली. शहाजहानला पाणी सुद्धा पुरेसे प्यायला मिळत नव्हते, तो झिजून झिजून मेला.
शीख धर्मगुरू बंदा बैरागी यांना पकडून त्यांचा अनन्वित छळ केला. तरीही ते इस्लाम कबूल करत नाही म्हणून त्यांच्याच लहान मुलाला मारून टाकले आणि त्या मुलाचे हृदय काढून बंदा बैरागी यांच्या तोंडात खुपसले. इतक्याने समाधान झाले नाही म्हणून डोळे फोडले , जीभ छाटली आणि शेवटी गळा चिरला. शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंग . यांना चार मुले होती. त्यापैकी जोरावर सिंग हा ६ वर्षाचा आणि फतेह सिंग हा ९ वर्षांचा होता. औरंगजेबाने यांना पकडले. धर्मांतरित व्हा म्हणून सांगितले. त्यांनी नकार दिला म्हणून त्यांना भिंतीत चिणून मारले. उरलेल्या दोन मुलांचा तलवारीने गळा चिरला.
छत्रपती संभाजी राजांचे सुद्धा त्याने असेच हाल केले ४० दिवस त्यांना अमानुष यातना दिल्या आणि शेवटी त्यांचा निर्घुण खून केला. धर्मवीर संभाजी राजांनी आत्मबलिदान दिले पण धर्म सोडला नाही. संभाजी राजांच्या बलिदानाने संपूर्ण मराठेशाही पेटून उठली आणि पुढील १८ वर्ष औरंगजेबाचे लचके तोडत तोडत त्यांनी त्याला कफल्लक केले. त्याचे सर्व मोठे सरदार मारले गेले, त्याच्या लक्षावधी सैन्यातील काही हजार सैनिक जिवंत उरले. प्रचंड संपत्ती असणारा त्याचा खजिना रिता झाला.
हिंदवी स्वराज्य तर संपले नाहीच पण आलमगीर म्हणवणारा औरंगजेब दीन अवस्थेत महाराष्ट्रातच मरण पावला. रत्नपूर / खुलताबाद इथे त्याच्या अंतिम इच्छेला अनुसरून त्याचे अंत्यसंस्कार केले गेले. त्याच्याच इच्छेनुसार कुराणच्या स्वलिखित नकला विकून आणि टोप्या शिवून आलेल्या रकमेतून त्याचे थडगे बनवले गेले. त्यावर एक सब्जा या वनस्पतीचे छोटे रोपटे लावले गेले. त्याची ही कच्ची मातीची समाधी निजामशाही राजवट येईतो तशीच होती. हैदराबादच्या निजामाने या कबरीभोवती संगमरवरचे नक्षीकाम करवले आणि मातीच्या थडग्याला संगमरवरचा चौथरा बांधला.
हिंदवी स्वराज्याला नष्ट करण्यासाठी लक्षावधी सैनिक अब्जावधी रकमेची तिजोरी , प्रचंड प्रमाणात हत्ती , घोडे , तोफा आणि सैन्यबळ घेऊन आलेला औरंगजेब मराठ्यांनी इथल्या मातीत गाडला. त्याला परत दिल्लीत पाय ठेवता आला नाही. स्वतःला आलमगिर अर्थात पृथ्वीसम्राट म्हणवणारा औरंग्या सह्याद्रीच्या कडांना धडका देऊन संपला. हिंदवी स्वराज्य अजेय राहिले.
आपल्या देशात काही राजकीय नेत्यांच्या कृपेने या नराधमाचे उदात्तीकरण सुरु झाले. औरंगजेब हा सुफी संत होता, तो महान होता हा प्रचार सरकारी पातळीवर सुरु करण्याचे पातक काही राजकीय पक्षाने केले आहे. राजकीय पक्षाच्या कृपेनेच औरंगजेबाच्या थडग्यासाठी दौलतजादा सुरु झाली आणि आजूबाजूचा परिसर काबीज करत या थडग्याचे उदात्तीकरण सुरु झाले. नंतर मुस्लिम तसेच हिंदू राजकीय नेत्यांनी जाऊन आणि चादरी वाढवून औरंगजेबाच्या कबरीला दर्गा बनवण्याचा घाट घातला आहे.
एरवी छोटी गोष्ट झाली तरी आक्षेप घेणारे पुरातत्व खाते औरंगजेबाच्या थडग्याच्या तिथे उभे रहाणारे बांधकाम आणि इतर गोष्टींच्या संदर्भात मौन धारण करून आहे ही गोष्ट या खात्यातील कर्मचाऱ्यांना अंदमानला पाठवणे किती आवश्यक आहे हे अधोरेखित करते आहे.
आता महत्वाचा मुद्दा औरंग्याची कबर ठेवावी का उध्वस्त करावी ?
हिंदुत्ववाद्यांचे म्हणणे आहे की पानिपतचे युद्ध घडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नजीबखानाची कबर ज्याप्रमाणे महादजी शिंद्यांनी सुरुंग लावून उध्वस्त केली त्याच प्रमाणे औरंग्याची कबर उध्वस्त केली जावी आणि संभाजी महाराजांवर त्याने केलेल्या अत्याचाराचा बदला घेतला जावा.
सेक्युलर मंडळी औरंगजेबाचा आजवर दडवून ठेवलेला काळाकुट्ट इतिहास उघड झाल्याने ओशाळली आहेत. त्यांचे बिंग उघड झाले आहे तरीही निर्लज्जपणाने ते औरंगजेब कसा महान राज्यकर्ता होता असे धादांत असत्य रेटून नेत त्याला महान सम्राट ठरविण्याचे उद्योग करत आहेत.
या वादाला अजून एक किनार आहे. औरंगजेब हा अत्याचारी राज्यकर्ता होता यात संशय नाही. परंतु अश्या विकृतांची स्मृती जपणे आवश्यक आहे. त्याची काही कारणे आहेत. आज जशी सेक्युलर मंडळींच्या रूपाने असणारी कीड आपल्या देशाला पोखरते आहे त्याकाळात सुद्धा अश्याच प्रवृत्तीच्या मंडळींनी औरंगजेबाला यशस्वी होण्यासाठी मदत केली आहे. असे असतानाही आपल्या वीरांनी या धरित्रीला रुधीराभिषेक घडवत स्वातंत्र्य अबाधित राखले आणि या दुष्ट लोकांचे थडगे आपल्या भूमीत गाडले जाईल याची काळजी घेतली आणि ही स्मृती जपण्यासाठी हे थडगे अस्तित्वात असणे आवश्यक आहे.
औरंगजेब असो किंवा अफझलखान असो यांचे थडगे मूळ स्वरुपात मातीचे बांधलेले राहू द्यावे. तिथे कुठल्याही मुजावरला नेमू नये. त्या कबरीला चादर सुद्धा वाहिली जाऊ नये. मातीचे थडगे वगळता तिथे काहीही बांधकाम असू नये. या कबरींवर चादर वहायाला बंदी असावी. जैसे थे या अवस्थेत, निसर्गाचा मारा सहन करत ही थडगी राहू द्यावी. टिकतील तितकी टिकतील. या थडग्यांच्या जवळ मोठे मोठे बोर्ड लावून या क्रूरकर्म्यांचा खरा इतिहास लिहावा जेणेकरून लोकांना वास्तवाचे भान येईल. शक्य असेल तर छावा चित्रपटासारखे त्यांच्या प्रवृत्तीचे वर्णन करणारे व्हिडियो कार्यक्रम तिथे रोज रात्री प्रसारित केले जावेत.
भारतीय लोक भोळे आहेत, क्षमाशील आहेत त्यामुळे औरंग्याचे थडगे उध्वस्त झाले तर भविष्यात आपले लोक औरंग्याचा खरा इतिहास विसरतील आणि म्हणूनच थडगे कायम ठेवून तिथे फलकांवर खरा इतिहास मांडून या दुराचारी मंडळींच्या कर्मांची माहिती सामान्य लोकांना वारंवार आणि नित्य सांगणे आवश्यक आहे.