सुनील भंडारे पाटील
इवलेसे रोप लावियेले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी....!
या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगानुसार
*आपला विकास आपल्या हाती* हा प्रेरणास्रोत घेऊन गेल्या २४ वर्षापासून बचत गटांच्या माध्यमातून सर्वसामान्य घटकासाठी शून्यातून भरारी घेत रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये यशस्वीपणे झेप घेणाऱ्या संतुलन महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा २४ वा वर्धापनदिन आणि संस्थेच्या संचालिका एडवोकेट पल्लवी रेगे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये ४०० हून अधिक गरजूंनी याचा लाभ घेतला, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सन्मान, वर्षभरामध्ये उत्कृष्टपणे कामगिरी करणाऱ्या बचत गटांचा सन्मान,
तसेच संतुलनच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी होऊन कौशल्य दाखविणाऱ्या महिलांचा कौशल्य प्रमाणपत्र वितरण सन्मान, कष्टकरी कामगारांचा सन्मान,विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम आणि संतुलन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते,
बचत गटांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांच्या तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर वर्षभरामध्ये देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जनसामान्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली,
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संतुलन संस्थेचे संस्थापक एडवोकेट बीएम रेगे यांनी संतुलन पतसंस्थेच्या आतापर्यंतच्या संघर्षमय वाटचालीचा लेखाजोखा सादर करून यापुढील काळात कष्टकरी आणि वंचितांच्या पाठीशी संतुलन पतसंस्था अशीच कायम पाठीशी भक्कमपणे उभी राहील असे आश्वासन दिले,
तर आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या संचालिका एडवोकेट पल्लवी रेगे यांनी संस्थेची आतापर्यंतची संघर्षमयी वाटचाल आणि बचत गटाच्या माध्यमातून सुरू केलेला संस्थेचा आतापर्यंतचा खडतर प्रवास सादर करून महिलांनी कोणत्याही क्षेत्रांमध्ये मागे न राहता सक्षमीकरण आणि सबलीकरणाद्वारे पुढे येऊन समाजाचे नेतृत्व करावे असा मोलाचा सल्ला दिला, तर संस्थेच्या अध्यक्ष वंदना भुजबळ यांनी पतसंस्थेचा अर्थसंकल्प सादर करताना संस्थेची एकूण बचत पाच कोटीच्या घरात गेल्याचे प्रतिपादन केले,
सारिका सिंग, कौशल्या पांदे आणि सीता जाधव या बचत गट चालकांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर वडगाव शेरी विधानसभेचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित वर्गाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधला, तर युवा नेते सुरेंद्र पठारे व सतीश मोरे सहाय्यक निबंधक कार्यालय सहाय्यक अधिकारी यांनी उपस्थित राहून संतुलनच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले,
याप्रसंगी शासकीय,शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, कृषी, वाहतूक क्षेत्रातील मान्यवर तसेच कष्टकरी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.