शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समता शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृह व समता विद्यार्थी वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू असल्याचे महिलाश्रम वसतिगृहाच्या अधीक्षिका शशिकला खेडेकर व समता विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक शंकर मुनोळी यांनी सांगितले.
मागासवर्गीय भटक्या, विमुक्त, जाती-जमाती, ओबीसी व आर्थिक मागास मुला-मुलींना मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शासन निर्णयानुसार प्रवेश देण्यात येत आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांना मोफत जेवण, गरम पाणी, शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके व निवासासाठी उत्तम व्यवस्था असून समता शिक्षण संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून तळेगाव ढमढेरे येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवण्यात येत आहे. तरी गरजू पालकांनी व विद्यार्थ्यांनी येथील अधीक्षिका शशिकला खेडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान संस्थेने केले आहे. इयत्ता पाचवी व त्यापुढील कोणत्याही वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात तसेच संस्थेच्या आनंद आश्रम शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा उषा वाघ यांनी केले आहे.