*कारेगाव-भांबर्डे स्कूल बस सेवा अल्पदरात सुरू*
*विद्यार्थी हितासाठी शाळेने घेतला निर्णय*
शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
भांबर्डे (ता. शिरुर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल हे गेल्या २८ पासून सुरू असून रांजणगाव गणपती- कारेगाव या औद्योगिक क्षेत्रात अनेक गोरगरीब मजूर कामानिमित्त येत असतात. मात्र त्यांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने अशा गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना कोणतेही प्रवेश शुल्क न आकारता मोफत प्रवेश देऊन विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही भावना ठेवून श्री अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ आणि शाळेने अल्पदरात कारेगाव-बाभुळसर- भांबर्डे अशी स्कूल बस सेवा विद्यार्थ्यांसाठी सुरू केली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सुरु केलेल्या या बस सेवेचा शुभारंभ पालक गजानन कांबळे, सुजराम देवासी, प्रकाश उचाळे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक मारुती कदम यांनी सांगितले की माझी शाळा नेहमीच गरीब, होतकरू शिक्षणासाठी आवड असणाऱ्या आणि शिक्षणात मागे असणार्या पाल्यांसाठी, तसेच विशेषतः मुलींना प्रथम प्रवेश देत आहे. अभ्यासात मागे असला तरी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे दरवर्षी इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो. शासकीय चित्रकला स्पर्धेत तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत व अन्य स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी उत्तम यश मिळवित आहेत. विद्यालयात वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनासह विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना हसत-खेळत कृतीयुक्त शिक्षण दिले जात आहे. स्कुल बस सेवा सुरू झाल्यामुळे कारेगाव ,बाभुळसर मधून येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आनंद झाला असून पालकांनी समाधान व्यक्त केल्याचेही मुख्याध्यापक कदम यांनी सांगितले. पालक गजानन कांबळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की परिसरातील स्थानिक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त झाल्याने प्रवेश मिळणे कठीण झाले होते. न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे शाळेने आमच्यासारख्या आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन आणि अतिशय अल्प दरात स्कूल बस सेवा सुरू केल्याने आमच्या सारख्या गोर-गरीबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे. त्यामुळे आम्ही पालक फार समाधानी झालो आहोत असेही त्यांनी सांगितले. यावेळी उद्धवराव घुगे, पंढरीनाथ बसापुरे, लालासाहेब जगताप, नानभाऊ थोरात आदी उपस्थित होते.