हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
खरोखर तहानभूक हरपायला लावणारी शाळा १५ जून रोजी सुरू झाली आणि सुट्टीला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला उधाण आले. सुंदरबाई मराठे विद्यालय प्राथमिक विभागात शाळेच्या पहिल्या दिवसाचा हा प्रवेशोत्सव आनंदात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा फुले, फुगे व पानांच्या तोरणांनी सजवली होती. ढोल-ताशांच्या गजरात सर्व बालकांचे स्वागत झाले. विद्यालयातील सर्व शिक्षकांनी औक्षण करून तसेच फुलांच्या पाकळ्या अंगावर टाकून मुलांचे आनंदाने स्वागत केले.
गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रामभाऊ मोझे साहेब तसेच शालेय समिती अध्यक्षा माननीय प्राध्यापिका अलकाताई पाटील यांच्या शुभहस्ते माता सरस्वती व श्री गणेशाचे पूजन करून शालेय उत्सवाची शुभ सुरुवात करण्यात आली, तसेच त्यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके ही वितरीत करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी अनेक गाणी-गोष्टी विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या भेटीसाठी डोरेमॉन, छोटा भीम, विदूषक, जादूगार आले होते. सर्व विद्यार्थी त्यांना पाहून हरखून गेले होते .हात हलवून, टाळ्या वाजवून, हात मिळवून आनंदाने त्यांच्यासोबत नाचत होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. डाळींबकर सर यांनी माता सरस्वती व श्री गणेश यांच्या वेशात आलेल्या विद्यार्थ्यांना हाताला धरून त्यांच्या वर्गात नेले व बसवले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला ,गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर मोझे साहेब यांनी या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनासाठी, शैक्षणिक ,सांस्कृतिक यशासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे नियोजन सुंदरबाई मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री डाळींबकर सर यांनी केले .सर्व शिक्षक वृंद याप्रसंगी उपस्थित होते.