शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
आमदार अशोक पवार यांच्या आदेशामुळे शिक्रापूर गावठाणसाठी एक अतिरिक्त रोहित्र ,शिक्रापूर येथे सततच्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक वैतागलेले असताना व अनेकवेळा निवेदने देऊनही विजेचा प्रश्न सुटत नव्हता. मात्र आमदार अशोक पवार यांच्या विषेश प्रयत्नामुळे शिक्रापूरकरांची सध्यातरी विजेची समस्या सुटली आहे.
सतत फ्युज जाणे, कमी दाबाने होणारा वीज पुरवठा यामुळे शिक्रापूर गावाठाणातील नागरिक व व्यापारी वर्ग त्रस्त होता. अनेक वेळा निवेदने देऊन देखील प्रश्न सुटत नव्हता. मागील महिन्यात ट्रान्सफॉर्मर जळाला आणि या प्रश्नाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले. जळालेला ट्रान्सफॉर्मर आमदार अशोक पवार यांच्यामुळे एका दिवसात बदलून मिळाला. परंतू त्या डीपीवर असलेल्या लोडमुळे पुन्हा डीपी जळण्याची शक्यता असल्याने अजून एक अतिरिक्त डीपी बसविण्याची आवश्यकता होती. त्यामुळे महावितरणचे शिक्रापूरचे सहायक अभियंता अशोक पाटील, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांच्याशी उपसरपंच मयूर करंजे तसेच रविंद्र पाटील व कार्यकर्त्यांनी चर्चा करून नवीन डीपीचा प्रस्ताव व अंदाजपत्रक बनवून घेऊन केडगाव येथे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांना समक्ष भेटून डीपी बसविणे बाबत चर्चा केली. त्यानंतर आमदार पवार यांना भेटून या डीपीची मंजुरी तात्काळ मिळावी अशी विनंती येथील नागरिकांनी केल्यानंतर आमदार पवार यांनी लगेचच कार्यकारी अभियंता एडके यांना फोन करून खास बाब म्हणून या डीपीला मंजुरी देण्याचे आदेश दिले. शुक्रवार (दि.१७ जून) रोजी नवीन डीपीची मंजुरी मिळाल्यानंतर अखेर आज रविवार ( दि.१९ जून) रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, माजी उपसरपंच रमेश थोरात, सुभाष खैरे, ग्रा.पं.सदस्या मोहिनी मांढरे, सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल सोंडे, शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे, भगवान पडवळ, महेश चव्हाण, आप्पा महाजन, सहायक अभियंता अशोक पाटील, रवींद्र पाटील, विजय काळे, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब चव्हाण, सिकंदर शेख आदी उपस्थित होते.