रांजणगाव गणपती, संभाजी गोरडे
रांजणगाव गणपती व कारेगाव परिसरामध्ये बेकायदेशीररित्या गॅस विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा सुळसुळाट झाला असून या व्यावसायिकांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणूक होत आहे.
शिरूर तालुक्यात औद्योगिक पट्टा असलेल्या पुणे-नगर महामार्गावर कोरेगाव पासून ते कारेगाव पर्यंत या अवैधरीत्या गॅस विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी उच्छाद मांडला असून हा सर्व गैरकारभार प्रशासनाच्या आशीर्वादाने तर चालला नाही ना अशी शंका सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे ?
कारण कारेगाव रांजणगाव सह संपुर्ण पुणे-नगर महामार्गावर या अवैधपणे गॅस व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी आपले बस्तान बसवले असून या व्यावसायिकांच्या या गैर कृत्यामुळे जर एखादी अघटित घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे? कारण या दुकानां पैकी बहुतांश दुकानही पुणे-नगर महामार्गालगत गर्दीच्या ठिकाणी आहेत व या छोट्या गॅस टाक्यांमध्ये अवैधरित्या गॅस भरताना स्फोट झाला असल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत.
मात्र प्रशासनाचे झारोतील शुक्राचार्य व गँस विक्रेते यांच्या हितसंबंधांमुळे या बेकायदेशीर गॅस विक्री कडे कानाडोळा करत आहे. या बेकायदेशीर गॅस विक्री च्या माध्यमातून ग्राहकांची आर्थिक लूट ही मोठ्या प्रमाणात होत आहे चौदा किलोचा गॅस एक हजार पाच रुपयाला तर तीन ते चार किलो चा गॅस पाचशे ते सहाशे रुपयाला विकला जात आहे. त्यामुळे या बेकायदेशीर गॅस विक्री वरती शासनाने प्रतिबंध घालावेत अशी मागणी नागरिकांकडून पुढे येऊ लागली आहे.