शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयात पुणे विभागाचे शिक्षक आमदार प्रा. जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक - शिक्षकेतरांच्या विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या सभेस शिक्षण उपायुक्त हरुण आतार, शिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहुळ, अधिक्षक कृष्णा डहाळे, महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे (फेडरेशनचे) समन्वयक दादासाहेब गवारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी दादासाहेब गवारे व शिवाजीराव खांडेकर यांनी शिक्षक - शिक्षकेतरांचे अनेक प्रश्न उपस्थित केले व तातडीने प्रश्न निकाली काढण्याची विनंती आमदार असगावकर व प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. आमदार असगावकर यांनीही यावेळी प्रशासकीय कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेषता पुणे जिल्हा भविष्य निर्वाह निधी व वेतन पथकाच्या गलथान कारभारामुळे अनेक समस्या निर्माण होत असल्याने त्यासंबंधी कडक उपाययोजना करण्याची सुचना आमदार असगावकर यांनी केली. प्रशासनाने देखील याची दखल घेऊन ठोस पाउले उचलण्याचे मान्य केले. या सभेमध्ये पेंडीग पगारबीले, फरक बिले, महिन्याच्या १ तारखेला पगार करणे, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे व प्रलंबित पावत्या लवकर मिळाव्यात, प्रलंबित वैद्यकीय बीले, सेवानिवृत्तांची विविध पेंडींग बीले, शालार्थ प्रणालीमध्ये शिक्षक व सेवकांची नावे समाविष्ट करणे, अनुकंपाखालील पदे ताबडतोब भरणे व मान्यता देणे, शिक्षक व सेवकांची पदोन्नती, शिक्षक-सेवकांची रिक पदे त्वरित भरणे, वैयक्तिक मान्यता देणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व तातडीने उपाययोजना करण्याचे ठरले.