शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सेनादलाचा दिनेश कुमार हा विजेता ठरला.
बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या गदिमा सभागृहात आयोजित सोहळ्यात बारामती टेक्सटाईल पार्कच्या चेअरमन सुनेत्रा पवार, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मिटकरी, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते बायका स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, विश्वासनाना देवकाते, पौर्णिमा तावरे, पुरूषोत्तम जगताप, किरण गुजर, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, प्रताप गायकवाड, सचिन सातव आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे (शनिवार वाडा) ते बारामती या राष्ट्रीय सायकल स्पर्धेत पुरूष गटात राष्ट्रीय स्तरावर दिनेश कुमार याने २ तास ३३ मिनिटे या विक्रमी वेळेत १२० किमी अंतर पार करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील उपविजेता ठरलेला राजस्थानच्या मुकेश कुमार याने हे अंतर २ तास ३४ मिनिटात पार केले. तर कर्नाटकच्या व्ही.व्यासख याने हे अंतर २ तास ३७ मिनिटात पार करून तृतीय क्रमांक पटकावला. सासवड ते बारामती सायकल स्पर्धा गटात उत्तर प्रदेशच्या दिनेश कुमार याने १ तास ३४ मिनिटात हे अंतर पार करून पहिला क्रमांक पटकावला. तसेच पुणे ते बारामती राज्य स्तर पुरुष गटामध्ये पुणे येथील सुर्या रमेश याने प्रथम क्रमांक, क्रिडा प्रबोधिनी पुणेच्या सिद्धेश पाटील याने द्वितीय तर अहमदनगरच्या ओम बाळासाहेब याने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे वैशिष्ट्य असलेला ‘घाटाचा राजा’ हा बहुमान राजस्थानच्या मनोज तरड याने पटकावला. त्याने राष्ट्रीय स्तरावर विक्रमी ९ मिनिटे ३४ सेकंदामध्ये दिवे घाट पार केला. तर राज्य स्तरावर हा बहुमान सिद्धेश पाटील याने ९ मिनीटे ५७ सेकंदामध्ये अंतर पार करून मिळवला. मेन इलाईट सासवड ते बारामती (८५ किमी) स्पर्धेत रविंद्र बदाणे (प्रथम), विठ्ठल भोसले (द्वितीय) तर विकास रोठे (तृतीय) आला. माळेगाव ते बारामती (१५ किमी) महिलांच्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये मणिपूरच्या मयंगलम चानू हिने प्रथम क्रमांक पटकावला तर महाराष्ट्राच्या मनाली राठोजी व कर्नाटकच्या शहा कुडीगनूर यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. १६ ते १७ वर्षे वयोगटात माळेगाव ते बारामती (१५ किमी) मुलींच्या गटात श्रावणी परीट, अनुष्का राऊत व आर्या नानवरे तर मुलांच्या गटात हर्षद पाटील, जयदीप काटकर व ओम काटे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. १४ व १५ वर्ष वयोगटात उत्कर्ष गार्दी (प्रथम), शिरीषकुमार शिंदे (द्वितीय) तर मैत्रेय भालेराव (तृतीय) आला.