शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
लोकमान्य टिळकांचा वसा आणि वारसा जपण्यासाठी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मार्गक्रमण करण्याचे आवाहन पलांडे माध्यमिक आश्रमशाळेचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी केले.
मुखई (ता. शिरूर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज शनिवार (दि. २३ जुलै) रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य शिरसाट बोलत होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आठवी ते बारावीच्या प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्ग प्रतिनिधी म्हणून भाषण करताना लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांच्या कार्यातून निर्माण होणारे आदर्श आपल्या भाषणातून व्यक्त केले. शिक्षक मनोगत व्यक्त करताना दातीर सर यांनी लोकमान्य टिळक यांनी केलेले देशासाठीचे कार्य, देशभावना या गोष्टी नमूद केल्या. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य तुकाराम शिरसाट पुढे म्हणाले की भाषण ही एक कला आहे आणि त्या कलेवर कशाप्रकारे प्रभुत्व मिळवता येऊ शकते, यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे, याविषयीचे अतिशय समर्पक असे टिळकांचे दाखले देत व स्वतः सादरीकरण करून समजावून सांगितले. आपल्या नेहमीच्या हास्य शैलीमधून एका विषयातून दुसऱ्या विषयात लीलया प्रवेश करत लोकमान्य टिळकांचे कार्य विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवले. तसेच लोकमान्य टिळकांच्या कार्याचा वसा आणि वारसा आपणाला पुढे चालवायचा असेल तर त्यांचे आदर्श आपण आपल्यामध्ये उतरवले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाली असे आपल्याला म्हणता येईल असेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपसिंग मल्लाव व सीमा पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली नागवडे यांनी केले. सविता लिमगुडे यांनी सूत्रसंचालन केले तर मनोज धिवार यांनी आभार मानले.