शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
राजकीय पक्षामधील शत्रूत्व व त्यातून सूडबुद्धीने होत असलेला केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर अयोग्य असून देशासाठी घातक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
पौड रोड (पुणे) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत अनंत व्याख्यानमालेत 'भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान' या विषयावर साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की संविधानाला धर्म-जात नसते. अल्पसंख्यांकांचे संरक्षण व जगण्याचा अधिकार घटनेनुसार अबाधित राहिला पाहिजे. समान नागरी कायदा करण्याचा प्रयत्न करून हिंदू- मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. संवेदनशील सरकार ही देशाची पहिली गरज आहे. अडचणीच्या वेळी लोकांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याची जबाबदारी सरकारची व समाजाची असली पाहिजे. जातीयवाद सामाजिक एकतेच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. स्वायत्त शासकीय संस्थांवर सरकारचा हस्तक्षेप असता काम नये असेही याप्रसंगी भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान या विषयावर बोलताना डॉ. सबनीस यांनी सांगितले. या कार्यक्रमास साहित्यिक वि. दा. पिंगळे, विठ्ठल गायकवाड, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड. संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए.एम.जाधव आदी मान्यवर तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मानद सचिव ऍड. संदीप कदम यांनी केले. अमृता खराडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य डॉ. पंडितराव शेळके यांनी आभार मानले.