लोणी काळभोर अनिकेत मुळीक
अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन स्वयंप्रेरणेने गुन्हे दाखल केले पाहिजेत. सहकार विभाच्या प्रत्येक सहायक निबंधकांनी जास्तीत जास्त तपासणी करावी आणि योग्य पद्धतीने गुन्हे दाखल होतील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमाबाबत समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. ते म्हणाले, ‘अवैध सावकारीविरोधात तक्रारी करण्याच्या अनुषंगाने पीडित नागरिकांनी पुढे येण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे. तक्रारदारांमध्ये आपली दखल घेतली जाईल असा विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. सहकार विभागाला या कायद्याच्या अनुषंगाने व्यापक अधिकार असून व्याजाच्या पैशाच्या बदल्यात केलेली खरेदीखते रद्द करण्याचेही महत्त्वाचे अधिकार या विभागाला आहेत. या अधिकारांचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी करावा.’