शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
सत्ता असो किंवा नसो धडाडीने काम करून विकासाचा अजेंडा पुढे घेऊन जाणारा नेता म्हणजे अजितदादा असल्याचे प्रतिपादन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
पौड रोड (पुणे) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत अनंत व्याख्यानमालेचे व्हर्चुअल (ऑनलाईन) उद्घाटन खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खा.डॉ.अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की विधायक, शाश्वत, विश्वासपूर्ण व विकासाचे राजकारण आणि समाजकारण करणारा नेता अशी अजितदादांची ओळख असून ती तरुणाईला प्रेरित करणारी आहे. शिवछत्रपतींनी आखून दिलेली आदर्श मूल्ये व तत्वे ही तरुणांसाठी आदर्शवत व प्रेरणादायी असून त्याचे अनुकरण युवकांनी करावे असे आवाहनही याप्रसंगी खासदार कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार साहित्यिक जयदेव गायकवाड होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार डॉ. राजन गवस यांनी या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना नागरिकत्वाचे काय? या विषयावर मार्गदर्शन केले. भारत हा श्रमिक व कष्टकऱ्यांचा देश आहे; त्यामुळे श्रम न करता मिळालेली संपत्ती टिकत नाही. अर्थार्जनासाठी प्रत्येकाने काहीतरी काम करणे आवश्यक आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करून कौशल्यधारीत शिक्षण देणे आवश्यक असल्याचे मतही याप्रसंगी डॉ. गवस यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास राज्याचे माजी सहाय्यक शिक्षण आयुक्त अनिल गुंजाळ, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड. संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए.एम.जाधव तसेच संस्थेच्या विविध शाखांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मानद सचिव ऍड. संदीप कदम यांनी केले. माया मयंकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्या सुषमा भोसले यांनी आभार मानले.