शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
अजितदादा पवार यांची दूरदृष्टी व कल्पक नेतृत्व यामुळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ हे यशाच्या शिखरावर आहे. शिक्षणातील गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू चमकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारवाडा (पुणे) येथे महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार रोहित पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्र ॲालिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अंकुश काकडे, माजी महापौर दिपक मानकर, सिने अभिनेते महेश कुलकर्णी, सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, बाबुराव चांदेरे, सुनिल चांदेरे, सुनिल जगताप, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव अॅड. संदीपजी कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, अधिष्ठाता डॅा. विजय खरे, अधिष्ठाता डॅा. दिपक माने, अधिष्ठाता डॅा. मनोहर चासकर आदी मान्यवर उपस्थिती होते.
पुणे ते बारामती अशी ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा झाली. विविध राज्यातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. तसेच संस्थेच्या विविध विद्यालय व महाविद्यालयातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सायकल रॅलीत सहभाग झाले होते. सायकल स्पर्धेतील स्पर्धकांचे ठिकठिकाणी संस्थेच्या विविध विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या संस्थेच्या ब्रीद वाक्यानुसार तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे केलेले कार्य प्रेरणादायी आहे. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली आहे; अशा स्पर्धांमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील असेही त्यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी राष्ट्रीय सायकल स्पर्धेला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे विद्यापीठ नेहमीच कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. आमदार रोहित पवार यांनी याप्रसंगी बोलताना कोविड महामारीच्या काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता गेली सात वर्षे सातत्याने या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. युवकांना आपले नैपुण्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक असते. त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवायची संधी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेची संकल्पना व महत्त्व स्पष्ट केले. या सायकल स्पर्धेची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली असल्याचे सांगतानाच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता खराडे व नितीन लगड यांनी केले तर अॅड. मोहनराव देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. सायकल स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा शिक्षण मंडळाशी संलग्नित सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.