शिरूर विशेष प्रतिनिधी
घरगुती गॅसधारकाच्या नावे ऑनलाईन दुगड एच.पी. एजन्सीकडून बुकींग दाखवून दिवसाला हजारो गॅस टाक्या काळया बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे घरगुती गॅसधारकाला गॅस टाकी वेळेवर उपलब्ध होत नाही.
काळया बाजारात घरगुती गॅसची विक्री मोठया प्रमाणात होत असल्याने सदर एजन्सी व रिफिलींग करणारे चांगलेच गब्बर बनले असून त्यांच्याआर्थिक ताकतीच्या जोरावर कारवाई करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याची चर्चा शिरूर शहरासह तालुक्यात रंगली आहे. निर्लज्ज प्रशासनामुळे नाकावर टिच्चुन रिफिलींगची दुकाने शिरुर तालुक्यात थाटात सुरू असून कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभारणार असल्याचे शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे यांनी सांगितले, जिल्हयासह शिरूर तालुक्यात या एजन्सीधारकांनी सब डिलरच्या नावाखाली गल्ली -गल्लीत, गावा-गावात ढिगभर सब एजन्स्या दिल्या आहेत. यांना दिवसाला फक्त ७ टाक्या देण्याऐवजी काळाबाजार करून बुकींग नसताना दिवसाला शेकडो टाक्या वितरित केल्या आहेत. भरवस्तीत, गर्दीच्या ठिकाणी ही दुकाने थाटली असून ७ टाक्यांऐवजी शेकडो टाक्या ठेवल्याने नागरीकांचा जीव धोक्यात आला आहे.