न्हावरे : सुजित मैड
न्हावरे येथील श्री.मल्लिकार्जुन विद्यालयामध्ये विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने ग्रंथदिंडी,वृक्षदिंडी चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थी गळ्यामध्ये तुळशीच्या माळा त्या सोबतच कपाळाला गंध, टिळा,डोक्यावर तुळस, हातात भगव्या पताका घेऊन सहभागी झाले होते. नुकताच आळंदी ते पंढरपूर - देहू ते पंढरपूर असा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील तो अनुभव घेता यावा यासाठी विद्यालयाने ग्रंथदिंडी,वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. ज्ञानबा तुकारामच्या गजरामध्ये हा सोहळा संपन्न झाला. टाळ,मृदुंग आदी वाद्यवृंदाने परिसर दुमदुमून गेला होता.अभंग आणि संतांवरील भजन गात रिंगण तसेच फुगडी देखील विद्यार्थ्यांनी खेळली. या दिंडी सोहळ्यामध्ये इयत्ता पाचवी चे नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. यावेळी भक्ती गीतांचे गायन ह.भ.प. संजय गायकवाड, मधुकरआण्णा शेलार यांनी केले व दिनेश शेलार सर यांनी मृदुंग वादन केले. या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने प्राचार्य अरविंद भोसले, पर्यवेक्षक बाळासाहेब भालेराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख धनंजय शितोळे व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर वर्ग व मधुकरआण्णा शेलार, संभाजीराव बिडगर, बाळासाहेब वेताळ, आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते .शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने दिंडीत सहभागी झालेल्या वारकरी विद्यार्थी यांना प्रसाद वाटप करण्यात आले,