दिव्यांग, निराधार व्यक्तींना तीन हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी.
पुरंदरला संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत ८० प्रस्तावांना मंजुरी.
सासवड बापू मुळीक
संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजने अंतर्गत दिव्यांग, विधवा, परितक्त्या, तसेच निराधार व्यक्तींना दरमहा एक हजार रुपये मानधन देण्यात येते. तसेच वार्षिक उत्पन्न एकवीस हजार यासाठी गृहीत धरण्यात येत आहे. सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्या कमी पैशात घर चालविणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे मानधनात वाढ करून किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी. त्याच प्रमाणे वार्षिक उत्पन्नात वाढ करून किमान ५० हजार रुपये उत्पन्न वाढ करण्यात यावी. श्रावणबाळ योजने अंतर्गत निराधार व्यक्तींना ६५ वर्षानंतर पेन्शन देण्यात येते. परंतु शासकीय अधिकारी, कर्मचारी ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त होत असताना ज्यांना कुणीच नाही अशा निराधार व्यक्तींना शासनाची पेन्शन मिळण्यासाठी ६५ वर्षे वाट पाहवी लागते, त्यामुळे वयाची अट शिथिल करून साठ वर्षे करण्यात यावी. अशा मागण्या संजय गांधी योजना समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
पुरंदर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये पेन्शन वाढ करण्याबाबत सर्वानुमते मागणी करून खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांना याबाबत निवेदन देण्याचे ठरले. समितीच्या अध्यक्षा तथा पंचायत समितीच्या सदस्या सुनिता कोलते, तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे, मिलिंद घाडगे, समिती सदस्य राजेश चव्हाण, संभाजी महामुनी, शांताराम बोऱ्हाडे, वैशाली निगडे, नीलम होले, कल्पना कावडे, उज्वला पोमण, विजय साळुंखे, डॉ. राजेश दळवी, संजय गांधी योजना विभागाच्या ममता दुरटकर आदी उपस्थित होते.
दरम्यान समितीने आतापर्यंत दोन हजार पर्यंत प्रस्ताव मंजूर केले असून सर्वाना अनुदान देण्यात येत आहे. समितीचे कार्यालयीन कामकाज उत्कृष्टपणे पाहणारे नायब तहसीलदार सुर्यकांत पठाडे यांची पुणे येथे बदली झाल्या निमित्त अध्यक्षा सुनिता कोलते यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.