नारायण महाराज यांनी दिलेली शिकवण सर्वांनी मिळून पुढे न्यावी - क्षिरसागर.
संकल्पपूर्ती निमित्त शिष्यगनांच्या वतीने पादुका अर्पण करून सन्मान.
सासवड बापू मुळीक
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांना शिक्षणासाठी कवाडे खुली केली. तर मुलींच्या वडिलांना हुंड्यासाठी दुसऱ्यासमोर झुकायला लागण्याची वेळ येवू नये यासाठी परमपूज्य नारायण महाराज यांनी १९८७ साली पुरंदर तालुक्यात बिगरहुंडा सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरु केली. नारायणपूरला तीर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून दिला. देशातील मध्यप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड येथे श्री दत्त मूर्तींचे भव्यदिव्य चार धाम निर्माण केले. आयुष्यभर कोणताही स्वार्थ ठेवला नाही अथवा चुकीचे काम केले नाही. अंधश्रद्धा, जादूटोणा यांना कोणताही थारा न देता जनतेला कायम सत्याच्या मार्गाने चालण्याचा मंत्र दिला. भक्ती आणि शक्तीच्या जोरावर कोणतेही कार्य सिद्धीस नेता येते हा दिलेला मंत्र आणि शिकवण सर्वांनी आत्मसात करून आयुष्यभर वाटचाल करावी असे भावनिक आवाहन श्री दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरत नाना क्षिरसागर यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील क्षेत्र नारायणपूर येथील श्री दत्त मंदिराचे परमपूज्य नारायण अण्णा महाराज यांनी देशात दत्त मूर्तींचे चार धाम निर्माण करण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प नुकताच पूर्ण झाला असून या निमित्ताने श्री नारायणधाम योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद संशोधन केंद्रामध्ये मंदिरातील सर्व शिष्यगण यांच्या वतीने संकल्पपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराजांना रुद्राक्षमाला, मोत्याचा हार, चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या. तसेच भारताच्या नकाशावरील श्री दत्त मूर्तीचे चित्र असलेले स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
महाराजांच्या संकल्पपूर्ती मध्ये मोलाचे योगदान देणारे भरत नाना क्षिरसागर, पोपट महाराज भोरकर, आणि श्री नारायणधाम योग, निसर्गोपचार आणि आयुर्वेद संशोधन केंद्राचे डॉ. उमेशकुमार डोंगरे यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील, विश्व परिषद संघाचे केंद्रीय महामंत्री महेंद्र वेदपाठक, इंदौरचे नाना महाराज तराणेकर, डॉ. संजय रावळ डॉ. दिलीप वाघोलीकर, प्रकाश बाफना,. पायगुडे त्याच प्रमाणे नारायणपूर येथील शिष्यगण आणि चार धाम मधील मान्यवर मान्यवर उपस्थित होते.