शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने क्रांती दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शालेय विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या समवेत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील समाज भूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाच्या वतीने हर घर झेंडा, हुतात्मा जवान व भारताच्या स्वातंत्र्याबद्दल विविध घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच प्रभात फेरी झाल्या नंतर हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मारकात अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना हुतात्मा पिंगळे यांच्या कार्याबद्दल माहिती सांगून त्यांनी केलेल्या शौर्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. फेरी पूर्ण झाल्यानंतर विद्यालयात अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत झाले. या कार्यक्रमास तळेगाव ढमढेरेच्या सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, ग्रामसेवक गोरे, तळेगाव ढमढेरे परिसरातील आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.