शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
बेरोजगार भूमिपुत्रांना रोजगार मिळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शिरुर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित खैरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शिरुर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित खैरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारकडून युवकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती, कारेगाव, कोंढापुरी, शिक्रापूर, सणासवाडी, कोरेगाव भीमा आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. मात्र स्थानिक युवकांना या ठिकाणी असलेल्या औद्योगिक कारखान्यात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे.
या औद्योगिक वसाहतीत अनेक बड्या नेत्यांची मक्तेदारी निर्माण झाल्याने बऱ्याचवेळा स्थानिक युवकांना डावलले जाते. शिरुर तालुक्यात कुशल व अकुशल कामगार मोठ्या प्रमाणात असून ते रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीला साथ देत भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक युवक कार्यरत आहेत. त्यांना रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना परिसरातील कारखाण्यात रोजगार मेळावे घेऊन रोजगार मिळवून देणे आवश्यक असल्याचेही रोहित खैरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.