शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत प्रशालेतील सर्व विद्यार्थिनी तसेच महिला शिक्षिकांकडून आपल्या भारतीय जवानांप्रती ते करत असलेल्या देशसेवेच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून राख्या पोस्टाद्वारे त्यांना पाठविण्यात आल्याची माहिती प्रशालेच्या प्राचार्या सुवर्णा चव्हाण यांनी दिली.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथे आयोजीत या कार्यक्रमासाठी विद्या सहकारी बँकेचे व शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेश ढमढेरे, शिरुर पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण भुजबळ, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, उत्तम ढमढेरे, जावेदभाई बागवान, राजेंद्र कर्हेकर, सचिन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात अरुण भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून शाळेने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सैनिकांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. त्याचप्रमाणे विजय ढमढेरे यांनी शाळेचा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून शाळेचा इतिहास मनोगतातून व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे यांनी केले. शिवाजी आढाव यांनी सूत्रसंचालन केले तर प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन ओमासे यांनी आभार मानले.