शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
मुखई येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज शनिवार (दि.१३ ऑगस्ट) रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव ढमढेरे येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे नातू उमाकांत पिंगळे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमासाठी विविध रंगी रांगोळ्या व सजावटीने परिसर बहरून गेला होता.
उमाकांत पिंगळे गुरुजी यांनी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे या क्रांतीकारकाचा जिवनपट विद्यार्थ्यांना उलगडून दाखवला. तसेच पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे याची जाणीव म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहीजे असा संदेश दिला. त्यानंतर प्रशालेचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांनी पर्यावरणाशी समर्पित होण्याची शपथ घेतली. आदरणीय पिंगळे गुरुजी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आपल्या मनमोकळ्या शैलीमध्ये क्रांतिकारक मंगल पांडे यांच्या पासून सुरु झालेली क्रांतिकार्याची प्रेरणा सुभाषचंद्र बोस यांच्या पर्यंत कशाप्रकारे येऊन ठेपली याचे दिलखुलास असे वर्णन केले. देशभक्तीपर राष्ट्रगीत, वंदे मातरम ही बंगालची आपल्या भारताला मिळालेली फार मोठी देणगी असल्याचेही पिंगळे गुरुजींनी सांगितले. तसेच हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे देशासाठीचे मौलिक क्रांतिकार्य आपल्या ओघवत्या भाषेमध्ये गुरुजींनी सर्वांसमोर मांडले. जाता जाता आपल्या भाषणातून गुरुजींनी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे ती ओळखूनच आपण पावले टाकली पाहिजे असे सूतोवाच करतानाच जर असे आपण केले नाही तर भविष्यामध्ये ऑक्सिजनच्या नळकांड्या घेऊन आपल्याला समाजामध्ये वावरावं लागेल असेही परखड मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी गुरुजींच्या पदस्पर्शाने आपली शाळा व आपण सर्वच खर्या अर्थाने धन्य झालो अशा भावुक भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक ढमढेरे व प्राचार्य शिरसाट यांच्या हस्ते पिंगळे गुरूजींचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक
ढमढेरे सर यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे परंतु खऱ्या अर्थाने नजरेसमोर न येणाऱ्या अशा क्रांतिकारकांच्या पोस्टर्सचे सुंदर असे प्रदर्शन भरवण्यात आलं होते; त्याचे देखील उद्घाटन गुरुजींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पिंगळे म्हणाले की सध्यातरी स्वातंत्र्यलढ्यामध्ये योगदान देण्यासाठी आपल्यासमोर परिस्थिती नसली तरीदेखील आजच्या तरूण पिढीने समाजासाठी व शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान दिले व विज्ञान क्षेत्रामध्ये योगदान दिले तर खऱ्या अर्थाने देशाचा विकास घडून येईल ; असे वक्तव्यही याप्रसंगी त्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोज धिवार यांनी केले तर किशोर गोगावले यांनी आभार मानले,