सासवड बापू मुळीक
भारतीय स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. १३ ते १५ ऑगस्ट या काळात " हर घर तिरंगा " या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक घर, शासकीय कार्यालय, खाजगी संस्था आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे याकालावधीत विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर कार्यक्रम पार पडणार आहेत. शाळा, कॉलेज मध्ये कार्यक्रमांची रंगीत तालीम सुरु करण्यात आली आहे. ठिकठिकाणी तिरंगा वाटप मोहीम राबविण्यात येत आहे.
वनपुरी ( ता. पुरंदर ) येथील श्री भैरवनाथ विद्यालयात स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्षण चित्रांच्या माध्यमातून तिरंगा साकारला होता. हातात तिरंगा घेवून उभा असलेला मुलगा, सूर्य मावळताना तिरंग्याच्या छटा, तिरंगा हातात घेवून फडकावीत असताना विद्यार्थी, भारताच्या नकाशातून साकारलेला तिरंगा, क्षेपणास्त्राच्या माध्यमातून साकारलेला तिरंगा, हातात तिरंगा घेवून निघालेला लष्करी जवान, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हाती तिरंगा घेवून निघालेले क्रांतिकारी अशा विविध छटामधून तिरंग्याचे चित्र साकारले होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. उपशिक्षक जनार्धन कांबळे, विजय गुरव, वैशाली यादव, दत्ता रोकडे, दत्तात्रय, सणस, दत्ता परदेशी, लेखनिक कीर्तीकुमार मेमाणे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मच्छिंद्र कुंभारकर यांनी विद्यालयात भेट देवून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्याध्यापक पोपट गायकवाड यांनी सांगितले कि, " हर घर तिरंगा " उपक्रम अंतर्गत गुरुवार अकरा ऑगस्ट पासून दररोज गावातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी होणार असून या माध्यमातून मोहिमेबाबत जणजागृती करण्यात येणार आहे. दि. १३ ते १५ ऑगस्ट या काळात सर्वत्र तिरंगा फडकविण्यात येणार असून याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देवून तिरंग्याचे महत्व तसेच स्वातंत्र्य चळवळ, देशभक्ती, देशा मधील थोर क्रांतिकारक आणि त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यातील योगदान याबाबत माहिती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यी, पालक आणि सर्व ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.