शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
कासारी येथील सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयास आस्था नो काय संस्थेच्या वतीने सुमारे ९ लाख रुपये निधीमधून ३० टॅब आस्था नो काय संस्थेच्या अध्यक्षा अरमीन मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कासारी (ता.शिरूर) येथील सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयास आस्था नो काय संस्थेच्या अध्यक्षा अरमीन मोदी, जर्मनी येथील प्रा. एंडर्स काटजा आणि जर्मनीच्या काही विद्यार्थिनींनी भेट दिली. यावेळी विद्यालयात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. या सर्व विदेशी पाहुण्यांचा समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे यांच्या हस्ते गणेश मूर्ती, शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यालयास प्रदान करण्यात आलेल्या टॅब वापरण्याविषयी माहिती अरमीन मोदी व प्रा. एंडर्स काटजा यांनी दिली तर विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्यामध्ये नवीन काही संकल्पना टाकण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी बोलताना जर्मनीहून आलेल्या मुलींनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे होते. यावेळी संस्थेचे संचालक गुलाब सातपुते, विद्यालयाचे प्राचार्य अशोक सरोदे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आजपर्यंत अरमीन मोदी यांनी विद्यालयाला अनेक वेळा केलेले सहकार्य अत्यंत मोलाचे असल्याचे यावेळी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य अशोक सरोदे यांनी सांगितले. या कार्यक्रमात धनश्री नरवडे या विद्यार्थ्यीनीने मनोगत व्यक्त केले तर विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब थोरात यांनी केले तर शिवाजी पाखरे यांनी आभार मानले.