शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
गणेशमूर्ती बनविण्याचे कौशल्य अनेक व्यक्तीमध्ये असतं. तसेच प्रत्येक काहींना कांही कौशल्य असतं. माणसाचं हे व्यक्तिमत्त्व त्याच्या हुशारी व कलेतून जगासमोर येऊन तो प्रसिद्धीस येतो. मात्र एका पानपट्टीवल्याने कमाल केली असून आपल्या सुपारी कापण्याच्या कलेतून पानपट्टीवालासुद्धा प्रसिद्धीस आला आहे. या अवलियाने सुपारीतून अनेक गणेशमूर्तीसह विविध देवदेवतांचे कोरीव काम केलेले आहे. संजीव हुंबरे असे या अवलियाचे नाव आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऐन तारुण्यात पानपट्टी चालविणाऱ्या हुंबरे यांनी आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त गणेशमूर्ती कोरल्या आहेत. अष्टविनायक गणेशाच्या सुपारीतून वेगवेगळ्या गणेशमूर्ती त्यांनी तयार केलेल्या आहेत. याशिवाय महादेव पिंड, कलश-श्रीफळ, अष्टविनायक, गरुड, मखर, तिरंगा, झेंडा, तोफ, मोर, पक्षीसह वैविध्यपूर्ण मूर्ती सुपारीतून कोरलेल्या आहेत. हुंबरे हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संत तुकाराम विद्यालयात लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर सध्याचा वेळ सुपारीपासून वेगळी कलाकुसर करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. गेल्या ३७ वर्षांपासून त्यांनी ही कला जोपासली आहे. सुपारी अडकित्त्यातून कापताना त्यांनी सुपारीतून विविध कला शिकल्या. यातून लहान व मोठ्या सुपारीतून गणेशाची पहिली मूर्ती १९८६ ला कोरली. त्यापुढे सुपारीतून विविध कलात्मक कोरीव काम यांनी साकारलेले आहे. त्यांच्या या कलेचे अनेक ठिकाणी कौतुक झाले आहे. सुपारीतून कला शिकणे अवघड आहे. पण, शिकण्याची जिद्द असणारे कमी असतात, म्हणून कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यांना या कोरीव कलेबद्दल अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. सुपारीसारख्या 'छोट्या वस्तूवर कोरीव काम करण्याचं कौशल्य पिढीजात नसून केवळ व्यावसायिक जबाबदारी सांभाळत असताना जडलेली कला आहे ; ही कला अवगत करण्यासाठी कोणतेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. विविध खेळ व सामाजिक संघटनांकडून मागणी झाल्यावर मोफत कला शिकवण्याचे काम हुंबरे करीत आलेले आहेत; ही कला इतरांनी शिकावी व जोपासवी म्हणून ते प्रयत्नशील असल्याचे यावेळी बोलताना संजीव हुंबरे यांनी सागितले.